राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
भुसावळ- दीपनगर वीज केद्रात रोजंदारी कामगार विजय वाकोडे हे 11 फेब्रुवारीपासून बेपत्ता असतानाही तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी ट्रेड युनियन कॉँग्रेसने दिला आहे. यासंदर्भात गुरुवारी शासकीय विश्रामगृहात अरुण दामोदर यांनी पत्रकार परीषद घेवून माहिती दिली. विजय वाकोडे हा रोजंदारी कामगार ठेकेदार आर.ए.वनवे यांच्याकडे कामाला होता. तो सकाळी कामावर गेला मात्र घरी परत आला नाही. याबाबत वनवे यांना वारंवार विचारणा केली असता ते नीट उत्तर देत नाहीत. याबाबत बेपत्ता कर्मचारी वाकोडे यांच्या पत्नीने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुळे न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकार्यांकडे राष्ट्रवादी ट्रेड युनियन कॉँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. तक्रार नोंदवून न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी जे.एस. नरवाडे, भरत पाटील, शांताराम जाधव, नरेश वाघ, भगवान निरभवणे, सिद्धार्थ सोनवणे, अंजना निरभवणे, सुदाम सोनवणे उपस्थित होते.