रोटरीतर्फे अस्थिव्यंग्य रुग्णांवर मोफत उपचार

0

17 मार्चला होणार चिकित्सा शिबिर

निगडी : रोटरी क्लब ऑफ चिंचवड, पॅन ऑर्थो हॉस्पिटल आणि नॅशनल सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्च 2018 रोजी लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अस्थिव्यंग असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. याबाबतची माहिती रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या अध्यक्षा अनघा रत्नपारखी, पॅन ऑर्थो हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंदार आचार्य, नॅशनल सोशल ग्रुपचे अध्यक्ष अनिल मित्तल, रोटरीचे प्रकल्प समन्वयक राजेश आग्रवाल, प्रसाद गणपुले यांनी मंगळवारी आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पॅन ऑर्थो हॉस्पिटल येथे 17 मार्च रोजी हे शिबिर पार पडणार आहे.

वॉकर, व्हिलचेअर देणार
या शिबिरामध्ये 0 ते 17 या वयोगटातील अस्थिव्यंग असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्यात जन्मजात अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, क्लबफूट, वेडेवाकडे हातपाय, हाडातील व सांध्यातील जंतूसंसर्ग यासह विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. डॉ. मंदार आचार्य म्हणाले की, आजाराचे निदान झाल्यावर मुलांच्या वेळेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे. निदान झालेल्या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. रुग्णाला आवश्यकतेनुसार वॉकर, व्हिलचेअर देण्यात येणार आहे. हे सर्व विनामोबादला असून शिबिराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

नावनोंदणी करणे आवश्यक
अनघा रत्नपारखी म्हणाल्या की, चिंचवड रोटरी क्लब विविध समाजोपयोगी, विधायक उपक्रम राबवित आहे. मोफत अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर हा उपक्रम सर्वांत चांगला उपक्रम आहे. याअंतर्गत रुग्णांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जाणार आहेत. त्यासाठी काही अटी-शर्ती लागू असणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी 020-27642764 या दूरध्वनी आणि 9112248067 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबिराचा शहरातील जास्तीत-जास्त गरजूंनी नावनोंदणी करुन लाभ घ्यावा असे आवाहन, आयोजकांनी केले आहे.