रोडरोमियोंचा वाढता उच्छाद

0

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनींबरोबरच महिलावर्गाला मोठा त्रास

पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : उद्योगनगरीत सध्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमियोंचा उच्छाद वाढत असून यांमुळे शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनीना, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रोडरोमीयोंची मजल मुलींचा विनयभंग करण्यापर्यंत जात असून केवळ भीती मुळे काही पालक त्यांची तक्रार करण्यास धजावत नाही. तर यांमुळे आपली शाळा, शिक्षण, नोकरी बंद होईल या भितीने मुलीही हा प्रकार पालकांना न सांगता निमूटपणे सहन करत असल्याने या रोडरोमियोंना चांगलेच रान मोकळे झाले आहे.

हॉर्न, आरडोओरड, विचकट भाव
एका दुचाकीवर ट्रिपलसीट बसून जोरजोरात कर्कश आवाज करत हॉर्न वाजवणे यांमुळे मुलींचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणे, मुलींना भरधाव वाहन चालवत कट मारून निघून जाणे, अचकट विचकट आवाज काढणे, मुलींना पाहून अश्‍लील हावभाव करणे असले प्रकार सध्या भोसरी परिसरात ठिकठिकाणी सुरु आहेत. भोसरीतील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी नजीकच्या ग्रामीण भागातील व उपनगरातील मुलींचीही मोठी संख्या आहे. तसेच नोकरीनिमित्त एमआयडीसीत जाणार्‍या महिला व मूलीही आहेत. बसस्थानकात वा स्थानकाकडे चालण्याच्या रस्त्यावर येताच रोड रोमियो मोठ्या संख्येने आपली हीरोगिरी दाखवत असतात. वर्गामध्ये तसेच कंपन्यांमध्येही काही मुले असे प्रकार करत असून त्यांना बाहेरील मुलांचाही पाठींबा मिळत असतो.

नाईलाजाने घुसमट सहन
त्याचबरोबर बसस्थानकापासून महाविद्यालयांपर्यंतचे बरेच अंतर असल्यामुळे या विद्यार्थिनी रस्त्यावरून पायी चालत असतांना रोडरोमियो मोटारसायकल वरून मागून येतात व मोठ्या आवाजात गाडीचा हॉर्न वाजवणे, रस्त्यावरून वेगात असलेल्या मोटारसायकलवरून मुलींना कट मारून जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत असल्याने मुलींना शिक्षणासाठी व नोकरीसाठी ही रोमियोगिरीची घुसमट नाईलाजाने सहन करावी लागत आहे.

पोलिसांच्या काठ्या बिनकामाच्या
रोमियोगिरी करणारे तरुणही अगदी सोळा ते एकोणीस वयोगटातील असून हिरोगिरी करण्याच्या नादात आपण काहीतरी गुन्हा करतोय याची जाणीव त्यांनाही नसल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या कृत्यांवर वेळीच प्रतिबंध घातला जात नसल्याने त्यांचे धाडस वाढत असून प्रसंगी विनयभंगासारखे गंभीर गुन्हे ही घडतांना दिसून येत आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी पोलिसांबरोबरच महाविद्यालय प्रशासन, शिक्षकांची ही जबाबदारी असून पालकांनी ही आपल्या मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. दरम्यान शहरातील भोसरी, पिंपरी, मोशी, आळंदी रस्ता, दिघी, चिखली,कुदळवाडी, आकुर्डी, निगडी, मोहन नगर, इंद्रायणी नगर, चिंचवड आदी भागातील शाळा, महाविद्यालय परिसरात हे प्रकार घडत असून यावर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. केवळ तक्रार येण्याची वाट पाहण्यापेक्षा पोलिसांनी स्वत:च लक्ष पुरवायला हवे असाही सुर पालक वर्गातून उमटत आहे.

अनेकांच्या पुढील शिक्षणास अडथळा…
शहरात अनेक कुटूंब राज्याच्या व देशाच्या कानाकोप-यातून रोजगारानिमीत्त शहरात आली आहेत. या मध्ये आनेकजण कष्टकरी वर्गात मोडत असून त्यांची घरची परस्थिती ही बेताचीच असते. तरी देखील आपल्या मुलीने शिकले पाहिजे यासाठी उच्च शिक्षणापर्यत मुलींना शिकवण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. याची जाणीव असलेल्या मुलीना महाविद्यालयात येताना जाताना अशा रोडरोमियोकडून त्रास झालातरी आपले शिक्षण बंद होईल या भितीने या बाबत तक्रार कुठेही तक्रार केली जात नाही. आणि असा प्रकार घरी समजल्यास पालक भितीपोटी आपल्या मुलीचे पुढील शिक्षण बंद करतात किंवा विवाहाची तयारी करतात. यामुळे इच्छा असूनही मुलीूंना पुढे शिक्षण घेता येत नाही. ही फार मोठी शोकांतिका होऊन बसली आहे. याला जबाबदार कोण हे देखील शोधणे तितकेच महत्वाचे आहे.

‘व्हाईट कॉलर’ रोमियोनां राजकीय बळ
चांगल्या वेशात सुशिक्षित पेहरावात राहून रोमियोगिरी करणारे ही भरपूर आहेत. केवळ सभ्य दिसण्यामुळे त्यांच्या कडे बोट करता येत नाही. अशांवर संशय ही घेता येत नाही तर कारवाई दूरच राहिली. बस,लोकल यांमध्ये हे रोमियो अगदी बिनधास्त चाळे करत असतात. अशा रोमियोंना स्थानिक पुढा-यांचे देखील पाठबळ मिळत असल्यामुळे त्यांना कोणत्याही घटकांची भिती राहिली नाही.

याला पोलिस कितपत जबाबदार…
कोणत्याही अवैध काम होऊनये म्हणून पोलिस यंत्रणेची भिती असणे आवश्यक असते. पण सध्या पोलिस यंत्रणे कडून मात्र सामान्यां भिती व समाजकंटकांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे अशा समाज उपद्रवी घटकांचे मुल्य वाढत आहे. या बाबत कितीही कायदे केले तरी पोलिस प्रशासनाकडून आपल्या कर्तव्यात नेहमीच कसुर केलेला दिसून येतो म्हणून पालक वर्गाकडून व अनेक मुलीकडून अन्याय झाला तरी त्या बाबतची तक्रार पोलिसात करावी तेवढी विश्‍वासाहर्ता अजूनही पोलिस विभागानी मिळवली नाही. त्यामुळे माझी पोलिस यंत्रणेला विनंती आहेकी, शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी पेट्रोलिंग वाढवून या प्रकारावर जरब बसवावी.
-विशाल वाकडकर
शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस