रोबोटिक्स स्पर्धेत यशस्वी संघाच्या पाठीवर ज्येष्ठांची कौतुकाची थाप!

0

जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाने केला गौरव; तंत्रस्नेही विद्यार्थी भारावले

भुसावळ- रशियातील आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भुसावळच्या टीम ब्लँका बोट्सने बाजी मारली. या स्पर्धेच्या माध्यमातून भुसावळचा डंका सातासमुद्रापार वाजला. जिगरबार अशा या तंत्रस्नेही टीमचा गौरव जय गणेश फाउंडेशन संचलित श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रविवारी करण्यात आला. भुसावळच्या सुरभीनगरातील नवसाचा गणपती मंदिरात हा गौरव सोहळा पार पडला. ‘द युनियन ऑफ यंग प्रोफेशनल्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने रशियातील एकाटीनबर्ग येथे आयंतरराष्ट्रीय हायटेक 2018 रोबोटिक्स स्पर्धा घेतली. त्यात भुसावळच्या संत गाडगेबाबा अभियांत्रिकी विद्यालयाच्या ब्लँका बोट्सने 110 किलो वजनी गटाच्या कॉम्बॅक्स रोबोटिक्स प्रकारात विजेतेपद पटकावले. जगराभरातील 69 देशांच्या टीम त्यात सहभागी होत्या. ब्लँका बोट्सने ‘धनाजी गामा 2.0 आणि ‘तानाजी’ या रोबोटची निर्मिती केली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्लँका बोट्सने पनिशर या ओमस्काय रशियन चॅम्पियन टीमचा अवघ्या तीन मिनिटांत पराभव केला.

विजयानंतर ज्येष्ठ नागरीक संघाने केला गौरव
भुसावळच्या ब्लँका बोट्सने मिळवलेल्या या दैदिप्यमान विजयाचा गौरव सोहळा रविवारी जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पार पडला. त्यात रोबोटिक्स स्पर्धा गाजवणार्‍या टीममधील विद्यार्थी अक्षय जोशी, प्रफुल्ल चौधरी, राहुल न्हावकर, रोहित वारके, गिरीश नंदनवार, ऋषिकेश बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र व पुषगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. एन. एम खंडारे, प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णीं यांचाही प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी. डी. जावळे, सचिव सुनंदा औंधकर, अलका अडकर, ताहेर खान, समन्वयक अरूण मांडळकर यांनी ‘टीम ब्लँका बोट्स’च्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आपण ज्या शहरात शिक्षण घेतोय त्याच शहरात पहिला सत्कार स्वीकारताना या विद्यार्थ्यांना गहिवरून आले.

भुसावळातून मोठे वैज्ञानिक घडणार
आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत आपल्या अंगी असलेल्या कौशल्याच्या बळावर भुसावळच्या टिमने डोळे दीपवणारे यश संपादन केले. त्यांच्या या यशाने शहराच्या लौकीकात भर पडली आहे. ही स्पर्धा गाजवणार्‍या विद्यार्थ्यांतून भविष्यात फार मोठे वैज्ञानिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास संघाचे अध्यक्ष डी. डी. जावळे, समन्वयक अरुण मांडळकर व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.