रोहयोच्या कामांमध्ये भ्रष्टाचार; चौकशीची मागणी

0

तत्कालीन शाखा अभियंत्यांच्या काळातील केलेली कामे निकृष्ठ !; माजी सरपंच नानासाहेब पवार

चाळीसगाव । चाळीसगाव जिल्हा परिषद बांधकाम विभगातील तत्कालीन शाखा अभियंत्याने सन 1992 ते 2017 याकाळात रस्त्यांची केलेली कामे नित्कृष्ट दर्जाची करुन त्यात मोठा भ्रष्टाचार केला आहे त्याची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी चाळीसगाव भाजप तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच नानासाहेब पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे 13 मार्च 2018 रोजी केली आहे.

नानासाहेब नामदेव पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजयकुमार शर्मा शाखा अभियंता जि.प.बांधकाम विभाग जळगाव सध्या कार्यरत पंचायत समिती धरणगाव हे चाळीसगाव तालुक्यात कार्यरत असतांना सन 1992 ते 2017 या कालावधीत त्यांनी रोजगार हमी व महात्मा गांधी रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) अंतर्गत अनेक गावात रस्त्यांची कामे स्वतः ठेकेदारी करुन नित्कृष्ट दर्जाची झाली आहेत, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असुन काही कामे फक्त कागदावरच झाली आहेत. यासर्व कामांची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी होवुन त्यांच्यासह दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करत याबाबत अनेकदा तक्रारी करुन सुद्धा कारवाई न करता भ्रष्ट अधिकारी याचे दोष झाकण्याचा प्रयत्न झाला आहे तरी या तक्रारीची त्वरीत तटस्थ व जिल्ह्याबाहेरील अधिकारर्‍यामार्फत त्यांच्या समक्ष चौकशी करावी, त्यासाठी लागणारे पुरावे देण्यास ते तयार आहेत असे न झाल्यास ग्रामपंचायत पिंप्री खुर्द येथील ग्रामस्थ, पक्षाचे कार्यकर्ते व ते स्वतः तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला असुन याप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास अथवा कायदेशीर बाब उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपण व भ्रष्ट शाखा अभियंता संजयकुमार शर्मा हे जबाबदार राहतील, असे शेवटी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, आयुक्त कार्यालय नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, तहसिलदार चाळीसगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत.