दुबई : आशिया चषक स्पर्धेत रविवारी झालेल्या भारत वि. पाकिस्तान सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकवित एकदिवसीय सामन्यांत सात हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे. एकदिवसीय सामन्यांत ७ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा नववा भारतीय फलंदाज ठरला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २३८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने ४० षटकांमध्येच नऊ गाडी राखून २३८ धावा करत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताचे सलामीचे फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा या विजयाचे शिल्पकार ठरले. शिखर धवनने ११४ तर रोहित शर्माने नाबाद १११ धावा केल्या. रोहितच्या ९४ धावा होताच त्याने ७००० धावांचा टप्पा पूर्ण केला. केवळ १८१ सामन्यांमध्ये त्याने हा टप्पा पूर्ण केला आहे. रोहित शर्मा हा सर्वात वेगवान ७००० धावा करणारा जगातला पाचवा तर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने १६१ तर सौरव गांगुलीने १७४ सामन्यांमध्ये ७ हजार धावा केल्या आहेत. पाकिस्ताननंतर आता भारताची पुढची लढत बांगलादेश विरुद्ध होणार आहे.