लंकेने वाढवली कोहलीची चिंता

0

कोलकाता । भारत दौर्‍यावर आलेला श्रीलंकेचा संघ बोर्ड प्रसिडेंट एकादश संघाविरुद्ध दौर्‍यातील पहिला सराव सामना कोलकात्यात खेळत आहे. या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढवण्याचे काम केले आहे. सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्या संघाने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 411 धावा करत कोहलीचे टेंशन वाढवले आहे. सामन्यात सलामीला आलेल्या करुणारत्ने आणि समरविक्रमाने 134 धावांची भागिदारी केली. करुणारत्ने 50 धावा झाल्यावर रिटायर्ड हर्ट झाला तर समरविक्रमा 74 धावा काढून बाद झाला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस आलेला थिरिमानेने 17 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या अँजेलो मॅथ्यूजने 54 धावा केल्या. कर्णधार दिनेश चंडिमल 29 धावा काढून रिटायर्ड हर्ट झाला. तर निरोशन डिक्वेलाने (73) शानदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बोर्ड प्रेसिडेंट एकादश संघाकडून संदीप वॉरियर आणि भंडारीने प्रत्येकी दोन आणि आवेश खान आणि जलज सक्सेनाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

पाहुणा संघ पूर्ण तयारीत
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 नोव्हेंबरपासून कोलकात्यातील इडन गार्डनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी बोर्ड प्रेसिडेंट एकादश संघाविरुद्धच्या श्रीलंकेच्या संघाने चांगली कामगिरी केली. या सराव सामन्यात श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीतील सहापैकी चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीला विचार करायला भाग पाडले आहे. त्यामुळे मायदेशात सपशेल अपयशी ठरलेला श्रीलंकेचा संघ यावेळी मात्र भारतीय संघाला जोरदार टक्कर द्यायच्या इर्‍याद्याने आला आहे.

वेगळ्या डावपेचांची आवश्यकता
भारत दौर्‍यातील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने शानदार कामगिरी करत चांगली सुरुवात केली आहे. श्रीलंकेच्या या सुरुवातीने कोहलीला वेगळी रणनिती आखण्यास भाग पाडले आहे. श्रीलंकेवर वर्चस्व मिळवता येतील असे डावपेच आखण्यासाठी कोहलीकडे आणखी तीन चार दिवस आहेत. त्यामुळे या आश्‍वासक सुरुवातीनंतर श्रीलंकेच्या संघाचे उंचावलेले मनोबल खच्ची करण्यासाठी कोहलीला पहिल्यापासूनच तयारी करावी लागणार आहे.