लक्झरीची आयशरला धडक

0

नरडाणा । येथील नरडाणा बायपासवर बुधवार 12 रोजी पहाटे झालेल्या लक्झरी बस व आयशरच्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नरडाणा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून इंदौरकडे जाणार्‍या एमपी-30/टी-9090 क्रमांकाच्या लक्झरी बसने मुंबईवरून इंदौरकडेच जाणार्‍या आयशर वाहनास (एमपी-09/जीएफ-9391 ) मागून धडक दिली. हा अपघात बुधवार रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडला. लक्झरी बसने मागील बाजूने आयशरला धडक दिल्याने आयशरच्या मागील भागासह वाहनातील गोण्या रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले. तसेच लक्झरी बसचे देखील या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लक्झरीचा चालक जखमी
हा अपघातात इतका भिषण होता की लक्झरी बसचा क्लिनर चेतन दवाणे (वय 25) रा. इंदौर हा जागीच ठार झाला. तर लक्झरी बसमधील मनिष हरीशंकर गुप्ता (वय 38) रा. इंदौर, नेल्सन निर्मल कुमरावत, दिपक कुमार रामेश्‍वर साव (वय 31) रा. इंदौर व आयशर ड्रायव्हर इफ्तीखार अब्दुल रशिद अर्शी (वय 35) रा. इंदौर हे गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात पहाटे सकाळी 3.30 वाजता घडली असून यावेळी सर्व प्रवाशी झोपत होते. लक्झरीला आयशरने धडक दिल्याने बसचा क्लिनर हा जागीच ठार झाला. तर चार जण जखमी झाले.

ग्रामस्थांनी केली मदत
अपघाताची माहिती मिळताच गावातील रोहीत शिसोदे, केतन जैन, विशाल चौधरी, मनसे जिल्हाउपाध्यक्ष अनिल सिसोदे, हर्षल चौधरींसह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर नरडाणा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास एपीआय. माथुरे व पोकॉ. बडगुजर करीत आहे.