लक्झरीतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

मयत सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी : स्लीपर कोचमधून कोसळताच घडली दुर्घटना

भुसावळ : भरधाव स्लीपर कोच लक्झरीतून पडल्याने सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री फैजपूर-भुसावळ मार्गावर घडली. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दादाहरी विश्वनाथ इंगोले (41, रा.महिम, ता.सांगोला, जि. सोलापूर) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. दरम्यान, या प्रवाशाने धावत्या वाहनातून उडी मारल्याचीदेखील चर्चा आहे.

पुणे जाण्यासाठी निघाला प्रवासी
गुरुवार, 23 रोजी रात्री आठ वाजता रावेर येथून श्री बालाजी ट्रॅव्हलची बस (क्रमांक एम.एच. 21 एक्स 3399) ही प्रवाशांना घेवून पुण्याकडे रवाना झाली. या बसमधून दादाहरी विश्वनाथ इंगोले हे देखील प्रवास करीत होते. यावल तालुक्यातील अकलूदजवळ बसमधील स्लीपर कोचमध्ये झोपलेल्या दादाहरी इंगोले हे कोसळल्याने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. या प्रकरणी कासवा पोलिस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मकसूद शेख, सहायक फौजदार हेमंत सांगळे, किरण चाटे, विकास सोनवणे करीत आहे.

प्रवाशाने लक्झरीतून उडी मारल्याची चर्चा
प्रवासी दादाहरी इंगोले यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.निखील तायडे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह त्यांच्या नातलंगांना सोपवण्यात आला. मयत हे पुण्यात सध्या वास्तव्यास असल्याची माहिती असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परीवार आहे. दरम्यान, धावत्या लक्झरी वाहनातून त्यांनी उडी मारल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अद्याप जाबजवाब नोंदवण्यात आले नसल्याचे सहा.निरीक्षक यांनी सांगत त्यानंतर घटनेची स्पष्टता होईल, असेही ते म्हणाले.