पंढरपूर : राज्यातील कर्जबाजारी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नुकतेच अशा शेतकर्यांना कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेतला. यापार्श्वभूमीवर मंगळवारी पंढरपूरात आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी सपत्नीक आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, देवा, विठ्ठला राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीसाठी बळ दे! असे साकडे साक्षात पांडुरंगाला घातले. आषाढी एकादशीनिमित्त प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहाटे श्री विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक महापूजा केली. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील परशराम मेरत व अनुसया मेरत या वारकरी दाम्पत्याला श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. मुख्यमंत्र्यांसोबत मेरत दाम्पत्यानेही पांडुरंगाची विधीवत पूजा केली. पहाटे दोन वाजता महापूजेला सुरुवात झाली. सुमारे दीड तास हा विधी सुरू होता. त्यानंतर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की आळंदी ते पंढरी आणि देहू ते पंढरी पायी वारी म्हणजे सुख देणारा सोहळा असतो़ भक्तीभावाने प्रेरित झालेल्या वारीतून वारकरी मजल दर मजल करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढीने झपाझप पाय टाकत पंढरीला येतात़ भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास पंढरीचा नक्कीच विकास होईल़ याबाबचा प्रस्ताव त्यांच्याकडूनच आल्याने पंढरीचा महिमा आता परदेशातही झाल्याचे पाहावयास मिळत आहे़.
महापुजेवेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी मंत्री उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
शेतकर्यांची कर्जमाफी झालीच आहे. पण शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत तो सुखी होणार नाही. त्यामुळे त्याला कर्जमुक्त करता येण्याबरोबरच गरिबांना, वंचितांना न्याय देता यावा, असे काम करण्याची शक्ती आम्हाला दे. विठ्ठल हा वंचितांचा देव आहे. वंचितांना तोच न्याय देऊ शकतो. त्यामळे तो माझी मागणी नक्की पूर्ण करील.
– देवेंद्रव फडणवीस, मुख्यमंत्री
चंद्रभागा प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30 जूनपर्यंत मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे़ परंतु या समितीत केवळ दोनच वारकर्यांचा समावेश आहे़ त्यामुळे ही समिती बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनेने केली आहे, मात्र ही समिती पूर्ण झाली नसून उर्वरित जागांमध्ये वारकर्यांचा नक्कीच समावेश केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच यावेळी निर्मल वारी यशस्वी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे अभिनंदन करतानाच नमामी चंद्रभागा हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आणि चंद्रभागा प्रदूषणमुक्त होण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले़.
… म्हणूनच मोठा मान मिळाला – परसराव मेरत
सोलापूर – आषाढी एकादशीदिनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याची इच्छा अनेकांची असली तरी हे भाग्य दरवर्षी एकाच दांपत्यला मिळत असते. यावर्षी हा मना सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र गाव (जि. बुलढाणा) येथील परसराव उत्तमराव मेरत ( वय 42) व त्यांच्या पत्नी अनुसया (वय 42) असे या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेरत दांपत्याचा सत्कार करण्यात आला. मेरत दाम्पत्य गेल्या 10 वर्षापासून पंढरीची वारी करतात. गेल्या 3 वर्षापासून ते वारीत माऊलींच्या पालखीत सहभागी होत आहेत. त्यांना 3 एकर जिरायत शेती असून 2 मुले व 2 मुली आहेत. आमचे पूर्व जन्माचे काही भाग्य असेल, म्हणून हा मोठा मान आम्हाला मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकर्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभरातचा मोफत पास व 15 हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला़
माऊलींचा गजर नि संतांचा जयघोष
भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या आणि कोटीकोटी जनांचे श्रध्दास्थान असलेली पंढरपूरनगरी आषाढी एकादशीदिनी बोला पुंडलिक वरदे हरी, विठ्ठल… अशा विठ्ठल नामाच्या जयघोषाने नि संतांच्या जयघोषाने दुमदुमून गेली. सर्वच दिंड्या काल रात्री उशीरापर्यंत पंढरीत दाखल झाल्या होत्या. आज उपस्थित लक्ष लक्ष भाविकांनी माऊलींचा गजर नि संतांचा जयघोष करीत जन्मोजन्मीचे ऋण फेडल्याचे समाधान मानून घेतले. माऊली भक्तांच्या प्रचंड गर्दीमुळे पंढरीत वैष्णवांचा अथांग सागर वाहत असल्याचे चित्र चंद्रभागेतिरी दिसून येत होते. शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. जिल्हा व पोलिस प्रशासनाने खास खबरदारी घेत संपूर्ण एकादशि सोहळा सुरळीतपणे पार पडण्यासाठी विशेष काळजी व खबरदारी घेतली. शहरातील मठ, धर्मशाळा, वाड्यांमध्ये, 65 एकर आणि चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटात भजन, कीर्तन आणि प्रवचनात भाविक दंग होते. अखेरीस विठू माऊलीच्या दर्शनाने पुण्य पदरी पडल्याचे समाधान मानून घेत असल्याचे चित्र पंढरीत होते.