लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलनं अॅपल कंपनीच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. हत्या झालेल्या मॅनेजरचं नाव विवेक तिवारी असून ते शुक्रवारी रात्री आयफोन लॉन्चिंगचा एक कार्यक्रम आटपून घराकडे जात असताना ही घटना घडली.
विवेक तिवारी शुक्रवारी रात्री आयफोन लॉन्चिंगचा एक कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या गाडीनं घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना गाडी थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर विवेक यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि हे प्रकरण वाढलं. प्रकरण वाढल्यानंर पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यानं विवेक यांच्यावर गोळी झाडली. यानंतर विवेक यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
‘विवेक यांना गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही त्यांनी गाडी थांबवली नाही, उटल माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला’ त्यामुळं स्वत:चा बचाव करण्यासाठी मी त्यांच्यावर गोळी झाडली असं या घटनेतील पोलिस कॉन्स्टेबलनं सांगितलं आहे. असं असलं तरी घटनेतील पोलिस कॉन्स्टेबलला कलम ३०२ अधिनियम अंतर्गत अटक करण्यात आली असून या घटनेची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहिती नुसार पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी त्यांनी पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. गाडी चढवत असताना त्यांच्या गाडीच्या जवळच उभी असलेल्या पोलिसांच्या बाइकला धडक लागली. म्हणून कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीनं विवेक यांच्यावर गोळी झाडली. विवेक यांचा मृत्यू बंदुकीतून झाडलेल्या गोळीमुळं झाला नाही तर गाडीच्या धडकेत जखमी झाल्यामुळं झाल्याचा दावा करण्यात येत आहे. असं असलं तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर खरं काय ते स्पष्ट होईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
#WATCH Kalpana Tiwari,wife of deceased Vivek Tiwari says,"Police had no right to shoot at my husband,demand UP CM to come here&talk to me." He was injured&later succumbed to injuries after a police personnel shot at his car late last night,on noticing suspicious activity #Lucknow pic.twitter.com/buJyDWts5n
— ANI UP (@ANINewsUP) September 29, 2018
अपघात नसून हत्या; पत्नीचा आरोप
हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप विवेक यांची पत्नी कल्पना यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पोलिस कॉन्स्टेबलनं विवेक यांच्यावर केलेले आरोप धुडकावून लावले आहेत. रात्री दीड वाजल्याच्या सुमारास माझं विवेक यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांची सहकारी सना त्यांच्यासोबत आहे हे देखील मला माहीत होतं. पोलिसांनी त्यांच्यावर गोळी का झाडली याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतील तेव्हाच विवेक यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील असंही कल्पना यांनी म्हटलं आहे.