लग्नपत्रिकेच्या माध्यमातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0

मुक्ताईनगर। आयुष्याच्या वेलीवर हळूवार फुलणारे पान म्हणजे तारुण्य.. याच तारुण्यात दोन जीवांच्या सात जन्माच्या गाठी जुळविणारी संस्कार म्हणजे विवाह! पण अशा कौटूंबिक स्नेहबंधन सोहळ्यातही सामाजिक आत्मभान जपण्याची बांधिलकी येथी सामाजिक कार्यकर्ते छबिलदास पाटील यांच्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून दिसून आली. स्त्रीभृणहत्या, जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन यांसारख्या सामाजिक संदेशाने ओतप्रोत असलेली ही विवाह पत्रिका पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवचरित्राच्या प्रभावामुळे पत्रिकेद्वारे मांडली विश्‍वात्म अपेक्षा
लोककवि वामन कर्डक यांच्या काव्यातील मर्म लक्षा घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे औचित्य पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते छबीलदास पाटील यांनी दाखविले आहे. तालुक्यातील उचंदे येथे 9 मे रोजी त्यांचा विवाह चि.सौ.का. प्रियंका पाटील यांच्याशी संपन्न होत आहे.

संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशच्या माध्यमातून छबीलदास पाटील यांचे सामाजिक कार्य जिल्हाभरात परिचित आहे. पुरोगामी समरस विचारसरणी बाळगून असणार्‍या या सामाजिक कार्यकर्त्याने विवाह जुळवितांनाही आदर्श तत्व जोपासली आहेत. लग्नपत्रिकेत आप्तस्वकीय तथा मित्रवर्गास स्थान तर दिलेच पण शिवचरित्राचा प्रभाव असल्यामुळे “जिजाऊ शिकवती शिवबाला… बळीचे राज्य येवो विश्‍वाला!” अशी विश्‍वात्म अपेक्षाही त्यांनी पत्रिकेतून नमूद केली आहे.

इतरांनी देखील बोध घेण्याची गरज
देशात स्त्रीभृणहत्या, पर्यावरण, जलप्रदुषण आदी विषय गहण संकट उभे ठाकले आहेत. मात्र यासंदर्भात विविध संघटनांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. त्यदृष्टीने मात्र हि जागृती कमी पडत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते छबिलदास पाटील यांनी आपल्या विवाहाच्या पत्रिकेत या विषयावर जनजागृतीपर संदेश दिला आहे. त्यामुळे याची समाजासह शहरात चर्चा आहे. यातून इतरांनी देखील बोध घेऊन पर्यावरणासह विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक जागृती होण्याची आवश्यकता आहे.