धुळे । राज्यभरात होत असलेल्या विविध लग्न समारंभामध्ये इव्हेंट कंपन्या व आयोजकांकडून विवाहस्थळी होणारी शिवरायांच्या मावळ्यांची विटंबना थांबविण्यात यावी अन्यथा संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळा संघटनेतर्फे आज (दि.08) रोजी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आला.
महाराष्ट्र धर्माचा घोर अपमान…
विवाहतिथी अर्थात लगीनसराई सुरु झाली आहे. या विवाह समारंभात काही लग्न हे शिवकालीन वातावरणात पार पाडले जातात. समाजातील काही लोकांकडून विवाह समारंभात शिवसृष्टीचा देखावा उभा केला जातो. त्यामध्ये शिवरायांचे मावळे प्रवेशद्वाराजवळ, सभामंडपात किंवा इतरत्र ठिकाणी उभे केले जातात. एवढेच नव्हे तर त्यांना चहा-कॉफी-कोल्ड्रींग सारखे पेय वाटपाचे काम दिले जाते. यामुळे स्वराज्यासाठी लढणार्या मावळ्यांची घोर विटंबना होत असून अवमान होत आहे. हा फक्त मावळ्यांचा अपमान नसून मराठी संस्कृतीचा अपमान आहे. विवाहासारख्या पवित्र समारंभात हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या प्रकाराचा अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळा संघटनेतर्फे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आपण आपल्या स्तरावर एक सूचनापत्रक काढून सर्व मंडप डेकोरेटर्स यांना सक्त सूचना द्याव्यात की, त्यांनी लग्नामध्ये यापुढे काम करणार्या माणसांना मावळ्यांचे पोशाख घालून काम करु देऊ नये. असे प्रकार पुन्हा निदर्शनास आल्यास अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळा संघटनेतर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्यात येईल. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भटु पाटील, रुपेश मराठे, हेमंत माळी, कुणाल चौधरी, विशाल पाटील, युवराज देवरे, शैलेंद्र साळे, महेश मराठे, प्रकाश पिंगळे आदी उपस्थित होते.