शाळेच्या नविन इमारतीसाठी 1 लाख रूपयांची देणगी
नारायणगाव :- जुन्नर तालुक्यातील निमगावसावा येथील शिवसेना नेते व उद्योजक भास्करशेठ गाडगे यांचे पुतणे चि.सचिन व चि.सौ.कां.प्रियांका यांच्या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने विवाहाप्रसंगी केला जाणारा मान-पान व इतर अनावश्यक खर्च टाळुन गाडगे व तट्टु कुटूंबाच्या वतीने निमगाव सावा येथील पंडीत नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नुतन इमारत बांधकामासाठी एक लाख अकरा हजार ऐकशे अकरा देणगी स्वरुपात देण्यात आल्याची माहिती युवा सेना विभाग प्रमुख शुभम गुंजाळ यांनी दिली. बेल्हे येथील राजदरबार मंगल कार्यालयात नुकताच हा विवाह सोहळा पार पडला.
उपस्थितांनी केले कौतुक
या सामाजिक जाणिवेने शैक्षणिक कामासाठी मोठी आर्थिक मदत केल्याने लग्नासाठी आलेल्या सर्वच पाहुण्यांनी या परिवाराने केलेल्या मदतीचे भरभरुन कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवर पाहुण्यांनीही शुभेच्छा देत समाजातील प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात होणारा अनावश्यक खर्च टाळुन गरजवंताला जमेल ती मदत करण्याचे आवाहन उपस्थित पाहुण्यांना केले.
यावेळी शिरुर लोकसभेचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, मा.पं.स.सभापती राजाभाऊ गुंजाळ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदआण्णा चौधरी, समर्थ एज्यु.चे संस्थापक वल्लभ शेळके, मंगेश आण्णा काकडे, पं.स.सदस्य रमेश खुडे, युवा सेना विभागप्रमुख शुभम गुंजाळ आदीसह सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.