पिंपरी चिंचवड : लग्न समारंभातील जेवणातून 70 जणांना विषबाधा झाल्याची घटना पिंपरी चिंचवड मधील रहाटणी येथे घडली. विषबाधा झालेल्यांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जेवणानंतर रात्रभर नागरिकांना उलटी आणि जुलाबाचे त्रास सुरू झाले होते. त्यामुळे या सर्वांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करावे लागले. यातील काही रूग्णांना यशवंतराव चव्हाण रूग्णालयात तर काहींना औंध रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रूग्णांमध्ये 16 मुले ही 12 वर्षे वयोगटातील आहेत. यामध्ये एका 11 महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे. काळेवाडी येथील थोपटे लॉन्स येथे रविवारी लग्न झाले होते. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी केटरर्सच्या मालकासह आइस्क्रीम पार्लर चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रविवारी संध्याकाळी काळेवाडी येथील थोपटे लॉन्स येथे रोकडे आणि भोगले कुटुंबीयांचा लग्न सोहळा होता. रात्री सुमारे 8 नंतर सुरू झालेल्या जेवणात विषबाधा झाल्याचे समोर येत आहे. या वेळी खाण्यासाठी डोसा, चायनीज पदार्थ, पाणीपुरी, आइस्क्रीम आदींसारखे पदार्थ होते. यातूनच विषबाधा झाल्याचे सांगण्यात येते. 14 रूग्णांवर यशवंतराव चव्हाण रूग्णालयात तर 56 जणांवर औंध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.