सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : ज्या जातीत आपण जन्माला येतो ती जात लग्नानंतर बदलू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आरक्षणासंदर्भातील एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सवर्ण समाजात जन्मलेल्या एका महिलेने मागासवर्गीय व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर आरक्षणाचा फायदा घेत मागासवर्गीय कोट्यातून 21 वर्षांपूर्वी केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी मिळविली होती. तिच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने हा निकाल दिला.
अशाप्रकारे नोकरी मिळविणे बेकायदेशीर
या याचिकेवरील सुनावणीदरम्यानच वरिष्ठ न्यायालयातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम. एम. शंतनागौदर यांच्या खंडपीठाने निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, ज्या जातीत आपण जन्माला येतो ती जात लग्नानंतरही कायम राहते. मागासवर्गीय समाजातील व्यक्तिशी लग्न केल्यानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणे बेकायदेशीर आहे. लग्नानंतर व्यक्तिची जात बदलू शकत नसल्याने संबंधित महिलेला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही, अशी तक्रार तिच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने या महिलेची केंद्रीय विद्यालयातील नियुक्ती अपात्र ठरविली होती. त्यानंतर या निर्णयाला या महिलेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.