लग्नापूर्वीच तरूणाचा मृत्यू ; मेहरूण तलावात सापडला मृतदेह

0

जळगाव। एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी अशोक पवार हे मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मेहरूण तलावाजवळ गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना तलावाच्या मध्यभागी एक मृतदेह तरंगताना आढळला. त्यांनी हेमंत कळसकर आणि बशीर तडवी यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर बशीर तडवी यांनी घटनास्थळावर आल्यानंतर शेख जमील शेख उस्मान यांना फोन वरून मृतदेहा संदर्भात माहिती दिली. शेख जमील यांनी त्यांचा भावाला तसेच सलमानची बहीण यास्मीन आणि भाऊ अरमान यांना घेऊन मेहरूण तलावावर आले. यानंतर पोलिसांनी रवी हटकर, किशोर सोनवणे, अक्रम, अब्दुल रशीद या पट्टी पोहणार्‍यांना बोलावून मृतदेह काठापर्यंत आणला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याच्या गळ्यातील माळा, अंगठ्या आणि दंडाला बांधलेला तावीत पाहिल्यानंतर बहिण यास्मीन व भाऊ अरमान यांनी त्याला ओळखले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत, हेंमत कळसकर, बशीर तडवी आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, लग्नाच्या दोन दिवस अगोदर भाऊ गेल्याने सलमानची बहीण आणि भावाने आक्रोश केला.

सलमान पोहण्यात तरबेज
मेहरूण तलावात बुडून मृत झालेला सलमान पटेल हा पट्टीचा पोहणारा होता. त्याला चांगल्या पद्धतीने पोहता येत होते. तर तो पोहण्यात तरबेज असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू होऊच शकत नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. त्याचा कोणी तरी घातपात केला असल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकरणात दोषी असणार्‍यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. असा पवित्रा सलमानच्या नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतला. त्यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी नातेवाईकांना त्याचा मृतदेह दाखविला. त्यावर कोणतेही मारहाण केल्याचे खुणा नव्हत्या. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. असे अश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी 3 वाजेच्या सुमारास नेरीनाका परिसरातील कब्रस्थानमध्ये सलमानचा दफनविधी करण्यात आला.

अखेरचे बोलणे झाले पत्नी सोबत
सलमानचा 25 मे रोजी पाचोरा येथील मुलीशी विवाह होणार होता. रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास होणार्‍या पत्नीला फोन लावला. त्यावेळी त्याचा मित्र सलमान बोलतो म्हणून तिच्याशी बोलला. मात्र तिने लगेच आवाज ओळखला. त्यानंतर सलमानने मित्रांसोबत मेहरूण तलावावर पोहण्यासाठी जात असल्याचे सांगून मोबाइल कट केल्याचे मुलीने सलमानच्या कुटुंबियांना सांगितले, अशी माहिती सलमानच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात सलमानच्या कुटूंबियांसह नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मोबाईल, पैसे,कपडे गायब…
सलमान रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घरातून गेला तेव्हा त्याच्या जवळ 5 हजार रुपये, मोबाइल होता. मात्र मंगळवारी ज्यावेळी त्याचा मृतदेह सापडला. त्यावेळी त्याच्या अंगावर कपडे नव्हेत. तर त्यावेळी त्याचा मोबाइल, पैसे आणि कपडे गायब होते. दुपारी त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा पूढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.