लघुउद्योजकांचा आंदोलनाचा पवित्रा

0

औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्येकडे ‘महावितरण’चे दुर्लक्ष

चिखली, कुदळवाडी, तळवडे, भोसरीत दररोज चार तास प्रवाह खंडीत
पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील विजविषयक समस्यांकडे महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहेत.वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचे सर्व अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. वीजचोरी, अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरा साहित्य पुरवठा अशा अनेक तक्रारी महावितरणसंदर्भात आहेत. येत्या आठवड्यात अधिकार्‍यांनी लक्ष घालून अडचणी न सोडविल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा लघुउद्योजकांनी घेतला आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन लघुउद्योजक संघटनेने अधिकार्‍यांना दिले आहे.

वीजेच्या पायाभूत सुविधा जुन्या
निवेदनात म्हटले आहे, की चिखली, कुदळवाडी, तळवडे एमआयडीसी, भोसरी पेठ क्रमांक सात आणि दहा परिसरात सद्यःस्थितीत रोज किमान चार ते पाच तास वीजपुरवठा खंडीत होतो. वास्तविक, पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीतर्फे दुरुस्तीची कामे केली जातात. परंतु, यंदा या प्रकारची कामे केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे उद्योगांना अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. वीजवाहिन्यांना अडथळा येणार्‍या झाडांच्या फांद्या वेळेत तोडल्या नाहीत. त्यामुळे या फांद्यांमुळेही वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. औद्योगिक परिसरातील विजेच्या पायाभूत सुविधा जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे ओवरहेड वायर तुटून आणि कमी क्षमतेच्या रोहित्रावर जादा भार दिल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत होतो. परिणामी कंपन्यांमधील महत्त्वाचे कामाचे तास वाया जात आहेत. यासंदर्भात लघुउद्योग संघटनेने महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, अधिकारी जाणुनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची शंका निर्माण झाली आहे.

भूमीगत केबल टाकाव्यात
ओव्हरहेड वायरने वीजपुरवठा केला जातो. बर्‍याच ठिकाणी वायरचे टेन्शन कमी झाल्यामुळे त्या खाली लोंबकळत असल्याचे दृष्टीस पडते. जास्त उंचीच्या माल वाहतूक करणार्‍या वाहनांना खालून जाता येत नाही. त्यामुळेही मोठ्या अपघाताची शक्यता असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. औद्योगिक परिसरात ओवरहेड वायर काढून भूमिगत केबलने वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरातील डीपी बॉक्सची झाकणे चोरीला गेली आहेत. त्यामुळे डीपी बॉक्स उघडे पडले असून, गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. फिडरचे अनेक खांब जुने झाले आहेत.

भोसरी कार्यालयात गेली कित्येक ज्युनिअर इंजिनीअर पदे रिक्त आहेत. औद्योगिक परिसरातील ग्राहक वीजविषयी तक्रारी करण्यास गेल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे लघउद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे समस्या आणि दुसरीकडे आर्थिक नुकसान अशा दुहेरी कात्रीत लघुउद्योजक सापडले आहेत. महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांनी या प्रश्‍नी लक्ष घालून, उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचार्‍यांचीच भरती
मंदीच्या वातावरणातून लघुउद्योजक अद्यापही सावललेले नाहीत. मोठ्या कंपन्यांकडून केलेल्या कामाचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने विज बील भरण्यासाठी हप्त्याची सोय उपलब्ध करावी. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. उद्योजकाचे विज बिलाचे चेक काही कारणास्तव परत गेल्यास पुन्हा चेकने बिल भरण्यास एक वर्षांपर्यंत बंदी केली जाते. तो कालावधी एक महिन्यांपर्यंत कमी करावा. वीजचोरी आणि गळती कमी करावी. अनुभवी कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे कंत्राटी कर्मचारी भरती केली आहे. त्यामुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यास चार ते पाच तासांचा कालावधी लागतो, अशी तक्रार संघटनेने केली आहे.

पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे महावितरणने केली नाहीत. त्यामुळे औद्योगिक परिसरात गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचे सर्व अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. वीजचोरी, अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरा साहित्य पुरवठा अशा अनेक तक्रारी महावितरणसंदर्भात आहेत. येत्या आठवड्यात महावितरणच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून अडचणी न सोडविल्यास लघुउद्योग संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल.
संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना