-बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे 250 व्या एस एम ई कंपनीचे लिस्टींग
मुंबई :- लघु-मध्यम उद्योगांनी त्यांच्या व्यवसायवृद्धी करण्यासाठी कर्ज घेण्यापेक्षा स्टॉक एक्स्चेंज मध्ये लिस्टींग करून भांडवल उभारण्यावर भर द्यावा. तसेच लिस्टींग केलेल्या कंपन्यांची मालकी ही मूळ मालकाकडे अबाधित राहते याबाबत प्रबोधन करावे. येथे येण्यासाठी व्यावसायिकांचे मन वळवावे आणि मनातील गैरसमज दूर करावेत असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे आज 250 व्या एस एम ई कंपनीचे लिस्टींग करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
देसाई पुढे म्हणाले, राज्यात उद्योग स्नेही धोरण राबविण्यात येते आहे. याचा फायदा लघु-मध्यम उद्योजकांना होत आहे. आज लिस्ट झालेल्या 250व्या कंपनीसह इतर लघू व मध्यम उद्योगांनी आतापर्यंत सुमारे 2 हजार 300 कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे. ज्याचे व्यावसायिक मुल्य 21 हजार कोटी रुपये एवढे आहे. उद्योग वाढीसह यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. आज 250 वी कंपनी लिस्ट झाली असली तरी हे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. लघू व मध्यम व्यावसायिक ज्यांची 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल आहे अशा कोणत्याही कंपनीला यात सहभागी होता येते.
उद्योग क्षेत्रात राज्याने सातत्याने आघाडी घेतली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज हे देशातील सर्वात जलद असे स्टॉक एक्स्चेंज आहे. इथे लघु-मध्यम उद्योगांची लिस्टींग करण्यातही राज्याने अग्रेसर असले पाहिजे. उद्योग आधारची नोंदणी केल्यामुळे राज्यातील उद्योगांची निश्चित आकडेवारी कळते. सर्व उद्योजकांनी आधार नोंदणी करावी असेही त्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही स्वागतार्ह बाब आहे. महिलांना उद्योग वाढीसाठी सहकार्य मिळावे यासाठी महिलांसाठी विशेष महिला धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या धोरणाबद्दल समजवून सांगण्यासाठी तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर प्रशिक्षण मेळावे आयोजित केले जात आहेत, अशी माहितीही देसाई यांनी यावेळी दिली.
ऑटोमोबाईल क्षेत्रात लागणारे रोबोटिक उपकरणं तयार करणारी कंपनी ऑटोमेशन लिमिटेड या कंपनीचे लिस्टींग यवेळी करण्यात आले. सन 2010 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीमार्फत भारतात आणि परदेशात रोबोटिक उपकरणं व त्यांचे पार्टस पुरविण्यात येतात. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या परंपरे नुसार बरोबर दहा वाजता उद्योगमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते घंटा वाजवून लिस्टींग झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे कार्यकारी संचालक आशिष चौधरी, सदस्य अजय ठाकूर, महावीर लुनावत 250व्या कंपनीचे संचालक मिलींद पडोले, मनमोहन पडोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.