नवी दिल्ली । आयपीएलचे माजी चेअरमन ललित ललित मोदी यांच्याकडून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फरारी असलेले मोदी यांनी महेंद्रसिंग धोनी संदर्भात एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी याही वेळा सोशल मीडियाचा खुबीने वापर करत इंस्टाग्रामवर एक पत्र शेअर केले आहे. हे पत्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अडचणीत आणणार असल्याची चर्चा आहे. ललित मोदींनी पोस्ट केलेल्या कागदपत्रानुसार धोनीचे इंडिया सिमेन्स कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून 43 हजार रुपये इतके मूळ वेतन दाखवण्यात आले आहे. धोनीच्या या नियुक्ती पत्राचा दाखल देत ललित मोदी यांनी त्याच्या वार्षिक कमाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
क्रिकेट वर्तुळात चर्चा: मोदींनी इंस्टाग्रामवर शेअर केलेले हे पत्र महेंद्रसिंग धोनीचे अपॉइन्टमेन्ट लेटर असल्याचा दावा करण्यात येत असून, हे पत्र अन्य कुणाच्या कंपनीचे नसून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांचे असल्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तूळात सुरू झाली आहे. या पत्रात बरेच खळबळजनक उल्लेख आहेत. पत्रातील उल्लेखानुसार धोनीला श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट कंपनीच्या चेन्नई कार्यालयात व्हाइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. भारतीय संघात अ वर्गातील खेळाडू असणार्या धोनीला दरमहा केवळ 43 हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. तसेच त्याला इतर सुविधा आणि भत्तेही देण्यात येत होते, असा उल्लेख आढळतो.
नियमावलीचे उल्लंघन!
हे पत्र इंस्टाग्रामवर शेअर करताना त्यासोबत ललित मोदींनी श्रीनिवासन, राजीव शुक्ला आणि आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची छायाचित्रेही शेअर केली आहेत. दरम्यान, श्रीनिवासन यांनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज या आपल्या संघाला फायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही ललीत मोदी यांनी या पत्राच्या माध्यमातून केला आहे. तसेच, बीसीसीआयच्या माजी अधिकार्यांनी सातत्याने नियमावलीचे उल्लंघन केले. त्यात धोनीचे अपॉइंटमेन्ट लेटर माझ्यासाठी धक्कादायक आहे. वर्षाला 100 कोटींहून अधिक कमाई करणारा खेळाडू श्रीनिवासन यांचा कर्मचारी होण्यासाठी का तयार होतो? असे अनेक प्रश्न ललीत मोदी यांनी विचारले आहेत.
श्रीनिवासन, शुक्ला, जेटलींवरही आरोप
धोनी बीसीसीआयचा ‘अ’ श्रेणीतील खेळाडू आहे आणि नियुक्ती पत्रात नमूद केलेल्या वेतनाची तुलना केली तर त्याला खेळातून मिळणारी मिळकत वेतनापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. ललित मोदी यांच्या म्हणण्यानुसार, धोनी वर्षाला 100 कोटी रुपये कमावत असताना श्रीनिवासन यांच्या कंपनीचा कर्मचारी होण्याची त्याला कोणती गरज होती? मी पैज लावून सांगतो अशाप्रकारचे अनेक फसवे करार धोनीसोबत करण्यात आले आहेत, असा आरोप ललित मोदींनी केला आहे. ललित मोदी यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन, राजीव शुक्ला आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. मोदींनी या पोस्टच्या माध्यमातून आयपीएल दरम्यान चेन्नई सुपरकिंग्ज संघाला कशाप्रकारे फायदा होईल, याची श्रीनिवासन यांनी काळजी घेतल्याचा आरोप केला.