लवकरच अडीचशे एकरांवर सफारी गार्डन होणार

0

धुळे। लवकरच अडीचशे एकरावर सफारी गार्डन होणार आहे. यांच्या किसान ट्रस्टच्या माध्यमातून सफारी गार्डन साकारले जाणार आहे. सफारी गार्डनच्या कामाची सुरुवात येत्या दोन महिन्यात होणार आहे. वर्षभरानंतर धुळेकरांसाठी सफारी गार्डन खुले होईल अशी माहिती आ.गोटे यांनी दिली आहे. आ.गोटे यांनी पत्रकार परिषद घेवून सफारी गार्डनबाबतची माहिती दिली. जवळपास 250-275 एकरावर सफारी गार्डन होणार असून त्यासाठी गेल्या 8 ते 10 वर्षात असंख्य अडचणी आल्यात. पर्यावरण खात्यापासून वन्यजीव संरक्षण कायद्यापर्यंतच्या सर्वबाबींचा विचारकरुन,त्याचा अभ्यास करुन सफारी गार्डनचे काम अडचणी दुर ठेवून सुरु केले जाणार आहे. सफारी गार्डनसाठीच्या मुलभुत सोयीसुविधांसाठी जवळपास पाच वर्ष लागणार आहेत, असे गोटे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती
आ. गोटे पुढे म्हणाले की, पर्यावरण खात्यापासून प्राणी आणण्यापर्यंतच्या कामासाठी ज्या परवानग्या लागतात त्यालाच अनेक वर्ष जातील म्हणून प्रथम पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी किसान ट्रस्ट भाडेतत्वाने 30 वर्षाच्या करारावर जागा आपल्या ताब्यात घेणार आहे. या जुनमध्ये हजारो झाडांची लागवड केली जाईल. त्याच बरोबर रस्ते,पाणवठेसह वन्य जिवांचे जगणे सुलभ व्हावे यासाठी अनुकुल असे वातावरण आम्ही तयार करणार आहोत. येत्या वर्षभरात देश-विदेशातील आतापर्यंत न पाहिलेली विविध प्रकारची खेळणी बालकांसाठी सफारी गार्डनमध्ये उपलब्ध करुन दिली जातील. त्यामुळे वर्षभरानंतर धुळेकर माता-भगिनी आपल्या चिमुरड्यांसह या गार्डनमध्ये येवू शकतील. वर्ष भर फुले येतील अशा प्रकारची झाडे आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील असेही आ.गोटे म्हणाले. जे प्राणी वन्यजीव कायद्यात येतात ते वगळता इतर प्राणी पक्षी सफारी गार्डनमध्ये आणले जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत तातडीने दखल घेवून संबंधीत खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सुचना दिल्या असून येत्या महिन्याभरात सफारी गार्डनची परवानगी मिळणार असल्याचे आ. गोटे यांनी सांगितले आहे.