लवकरच वाघोली-भावडी बायपास रस्ता

0

रामदास दाभाडे यांची माहिती : पुणे-नगर महामार्गाला पर्यायी रस्ता

वाघोली : आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पाठपुराव्याने वाघोली-भावडी गावांच्या शिवेवरून जाणार्‍या भावडी फाटा ते लोणीकंद रस्त्याच्या कामाची टेंडरप्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी दिली. पुणे-नगर महामार्गाला पर्यायी बायपास होणार्‍या या रस्त्यासाठी जवळपास 12 कोटी रुपये खर्च करून सात मीटर रुंद आणि 3.90 किमी लांब अंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पीएमआरडीएकडून वाघेश्‍वर मंदिराच्या मागील बाजूने बीजेएसपर्यंतचा बायपास रस्ता करण्यात येणार होता. त्याचे टेंडरही काढण्यात आले होते. शेतकर्‍यांचा होणारा विरोध व स्थानिक परिस्थिती लक्षात घेता वाघोली-भावडी गावांच्या शिवेवरून लोणीकंद (सुरभी हॉटेल) मार्गे महामार्गाला जोडणार्‍या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करण्याचा पर्याय पुढे आला.

12 कोटींचा खर्च

आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या रस्ता उभारणीसाठी पाठपुरावा केला. पीएमआरडीकडून 7 मीटर रुंद आणि 3.90 किमी लांब अंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता घेऊन रस्त्याच्या कामची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

मुलभूत सुविधांकडे विशेष लक्ष

वाघोली येथील मुलभूत समस्या सोडवण्याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आदी मुलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देऊन निधीही उपलब्ध करून दिला. त्यामुळे वाघोलीतील विविध विकासकामांना गती मिळाली असल्यामुळे आयुक्त गित्ते वाघोलीकरांवर विशेष मेहरबान असल्याचे दिसून येते.