लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

0

जम्मू । जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश मिळाले आहे. जम्मू-कश्मीमधील बडगाम जिल्ह्यातील हयातपुरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानंतर केलेल्या कारवाईत दोन दहशवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आले आहे.

सीमा सुरक्षा दलाने कंठस्नान घातलेले हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे आहेत. परिसरात आणखी दहशतवादी लपले असल्याची शक्यता असल्याने जवानांनी शोधमोहीम तीव्र केली. यापूर्वी 28 मार्चला बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. चकमकीदरम्यान एक दहशतवादी आणि दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. हयातपुरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या भागाला वेढा देत शोधमोहीम सुरू केली. शोध मोहिम सुरू असताना अचानक दहशतवाद्यांनी दोन सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला. या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना दोघांचा खात्मा करण्यात यश आले आहे.