नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या पेहरावात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे.आताच्या गणवेशापेक्षा अधिक सुटसुटीत करण्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती एका इंग्रजी दैनिकाने दिली आहे. त्यासाठी लष्कर अधिकाऱ्यांकडून मुख्यालयाने सूचना मागवल्या आहेत. देशाच्या लष्करी मुख्यालयाने या संदर्भात ११ संचलनालयांना पत्र पाठवले असून, त्यांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत.
लष्कराच्या पेहरावाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असून, त्यात लष्कराच्या गणवेशात बदल होऊ शकतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. अनेक देशाच्या लष्कराच्या पेहरावात वेगवेगळे रंग असतात. त्याच धर्तीवर आपल्या गणवेशात देखील बदल करता येऊ शकतो असे सुतोवाच केले आहे. जवानाच्या बेल्टमध्ये पण काही बदल करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या वापरात असलेला बेल्ट न वापरल्यास गणवेश अधिक सुटसुटीत व स्मार्ट होईल, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.