नवी दिल्ली । महाराष्ट्रातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांसाठी कार्यरत असलेल्या एका रॅकेटचा शुक्रवारी भाडाफोड झाल्यावर आता भारतीय लष्करातही हा प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. लष्कराच्या मुख्यालयातील हा कथित बदली घोटाळा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उघड केल्यानंतर, त्यासाठी जबाबदार असलेल्या लेफ्टनंट कर्नल रंगनाथ सुवर्णमणी मोनी आणि एका मध्यस्थी व्यक्तीला अटक केली आहे. हव्या त्या ठिकाणी बदली आणि पोस्टिंगसाठी लाखो रुपये घेण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर लेफ्टनंट कर्नल रंगनाथ सुवर्णमणी मोनी आणि गौरव कोहलीला बंगळुरूमध्ये एका लष्करी अधिकार्यांच्या बदलीसाठी 2 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल रंगनाथ सुवर्णमणी मोनी आणि गौरव कोहलीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. सीबीआयने लष्कराच्या मुख्यालयात कार्यरत असलेले लेफ्टनंट रंगनाथ सुवर्णमणी मोनी, हैदराबादचे लष्करी अधिकारी पुरुषोत्तम, गौरव कोहली आणि बंगळुरूमध्ये कार्यरत असलेले लष्करी अधिकारी एस. सुभाष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लेफ्टनंट मोनी हे कोहली आणि पुरूषोत्तम यांच्या मदतीने अधिकार्यांच्या बदल्या करत असत.
बदली प्रकरणात सीबाआयने दाखल केलेल्या प्रथमदर्शनी अहवालामध्ये एका ब्रिगेडिअरचेही नाव आहे. मात्र आरोपींच्या यादीमध्ये ब्रिगेडियरच्या नावाचा समावेश नाही. लष्करी मुख्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅकेट सुरू असल्याचा सीबीआयला संशय आहे.