लष्करी साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ३ हजार कोटीची मंजुरी

0

सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि एआरव्ही गाडया विकत घेणार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने लष्करी साहित्य खरेदीसाठी ३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाच्या व्यवहाराला शनिवारी मंजुरी दिली. नौदलाच्या दोन स्टेल्थ फ्रिगेटसाठी सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि लष्कराच्या अर्जुन रणगाडयासाठी एआरव्ही गाडया विकत घेण्यात येणार आहेत. संरक्षण साहित्य खरेदीसंबंधी निर्णय घेणारी मंत्रालयाची सर्वोच्च समिती संरक्षण खऱेदी परिषदेने मंजुरी दिल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली डीएसीची ही बैठक पार पाडली. भारत एक अब्ज डॉलर मोजून रशियाकडून दोन स्टेल्थ फ्रिगेट विकत घेणार आहे. या दोन्ही फ्रिगेटस ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असतील. ब्राह्मोस हे भारताचे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून भारत आणि रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

भारतीय लष्कराचा मुख्य रणगाडा अर्जुनसाठी एआरव्ही गाडया विकत घेण्याला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. एआरव्ही गाडी डीआरडीओने विकसित केली आहे. सरकारी कंपनी बीईएमएल या एआरव्ही गाडया बनवणार आहेत.