पालिकेने कालव्यातील पाणी केले बंद : पाण्यासाठी पालिकेला साकडे
पुणे : लष्कर जलकेंद्रासाठी महापालिकेकडून या महिन्यापासून पर्वती जलकेंद्रातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी घेतले जात आहे. त्यामुळे शेतीचे आर्वतन संपताच कालवा बंद करण्यात आला आहे. परिणामी, सीरम इन्स्टिट्यूट, लष्कर अभियांत्रिकी महाविद्यालय (एमईएस), अॅमोनोरा टाऊनशिप तसेच आळंदी रस्त्यावरील लष्करांच्या बीईजी केंद्राचा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे पाणी द्यावे, या मागणीसाठी ही कार्यालये वारंवार पालिकेकडे संपर्क साधत आहेत.
पाटबंधारे विभागाची तारांबळ
महापालिकेकडून लष्कर जलकेंद्रासाठी आतापर्यंत खडकवासला मुठा कालव्यातून पाणी घेतले जात होते. त्यामुळे कालव्यात दररोज 100 ते 1500 क्युसेक पाणी सोडले जात होते. यातून उपरोक्त संस्था आणि त्यांच्या कार्यालयांसाठी कालव्यातील स्वतंत्र जलवाहिनीमधून पाणी घेतले जात होते. मात्र, आता महापालिकेने थेट खडकवासला धरण ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत बंद जलवाहिनी टाकली आहे. त्यामुळे महापालिकेस कालव्यातून पाणी घेण्याची गरज राहिलेली नाही. असे असतानाच, पाटबंधारे विभागानेही कालवा पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे या संस्थांना कालव्यातून उचलण्यासाठी पाणीच नसल्याने त्यांची गोची झाली आहे. तर या संस्थांना दररोज सुमारे 96 एमएलडी पाणी लागते. हे पाणी सोडायचे झाल्यास कालव्यात होणारी 150 एमएलडीची गळती आणि हे 96 एमएलडी असे सुमारे 250 एमएलडी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाचीही चांगलीच तारांबळ झाली आहे.
लष्करी अधिकारी संतप्त
कालव्यातील पाणी पाटबंधारे विभागाने बंद केले असले, तरी पाणी द्यावे अशी मागणी लष्करी संस्थांनी केली आहे. मात्र, आधीच शहरात पाणीकपात असल्याने तसेच पाणीकोटा मर्यादित असल्याने पालिकेने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये पाण्याची बोंब झाली असून लष्करी अधिकार्यांच्या रोषाचा सामना पालिकेच्या अधिकार्यांना करावा लागत आहे. मात्र, त्यांना कालव्यातूनच पाणी देणे शक्य असल्याने काहीच करता येणार नसल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे.
..तर कोणावर फोडणार खापर?
कालवाफुटीनंतर पालिकेस पाणीपुरवठ्यासाठी संपूर्ण वर्षभर पाणी द्यावे लागत असल्याने कालवा बंद ठेवता येत नाही, तसेच दुरुस्तही करता येत नाही असे पाटबंधारे विभागाने सांगत पालिकेवर खापर फोडले होते. आता कालवा बंद ठेवल्याने या संस्थांचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना पाणी देण्यासाठी पुन्हा कालवा सुरूच ठेवावा लागणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागास दुरूस्ती करता येणार नाही. त्यामुळे पाटबंधारे विभाग आता कालव्यातील गळती तसेच दुर्घटना झाल्यास कोणावर खापर फोडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.