जळगाव । जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव मार्फत दूध उत्पादकता वाढ कार्यक्रमाअंतर्गत सभासद दूध उत्पादकांच्या जनावरांना तांत्रिक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. लसीकरणाच्या अगोदर जनावरांना गावपातळीवर एकत्रित कृमी निर्मुलन कार्यक्रम राबविण्यात आला असून, उत्पादकांना 100 टक्के अनुदानाने कृमीनाशक औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. 38 हजार जनावरांसाठी 10 लाख 64 हजार रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. या दोन्ही योजनांचा आढावा घेता दूध संघाने आजवर सभासद दूध उत्पादकांसाटी जवळपास 21 लाख इतकी रक्कम खर्च केलेली असून, यापुढे मार्च 2018 अखेर 50 हजार जनावरांना संरक्षण देण्याचा संघाचा मानस आहे.
38 हजार जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट
दूध संघाच्या या उपक्रमामुळे दूध उत्पादक सभासदांचे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत झालेली आहे. सन 2017-18 या कालावधीत दूध उत्पादकांच्या जनावरांना ‘रोगापेक्षा प्रतिबंध बरा’ या उक्तीनुसार लाळ्या खुरपत, घटसर्प, फर्या या संसर्गजन्य रोगांपासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी तिन्ही रोगांसाठी एकत्रित रक्षा ट्रायओव्हॅक या लसीचा वापर करून दूध उत्पादनात होणारी घट व औषधोपचारावर होणारा खर्च टाळण्यासाठी जवळपास 38 हजार जनावरांना 100 टक्के अनुदानाने प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आहे. त्यासाठी संघाने 10 लाख 26 हजार इतकी रक्कम टोचणीसह खर्च केलेली आहे. जिल्ह्यात इतर कुठल्याही संस्थेने हे लसीकरण उपलब्ध करून दिलेले नव्हते. यामुळे दूध उत्पादक सभासदांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान टाळण्यास मदत झाली आहे.