धुळे । कोणतेही मुल हे जन्मताच नाट्यरंग घेऊन जन्माला येत असते. लहान मुले भातुलकीचा खेळ खेळतात. तेव्हा ते एक प्रकारे नाटकच असते. परंतु, पालक, शिक्षक याकडे दुर्लक्ष करतात. लहान मुलांच्या प्रत्येक कृतीत नाट्य असते. मात्र, त्यांच्यातील या कलागुणांचा लहानपणी विकास होत नाही, अशी खंत व्यक्त करत अभिनय हा अनुकरणातून नव्हे; तर प्रत्यक्ष कृतीतून जन्माला येत असतो, असे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक व कवी सुभाष अहिरे यांनी येथे सांगितले. धुळे ग्रंथोत्सवात सकाळच्या सत्रात ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक व कवी अहिरे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. प्रा. सदाशिव सूर्यवंशी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्याध्यापिका मनीषा जोशी, शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता ढिवरे, अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, स्मीता उपासणी, अश्विनी ठाकूर आदी उपस्थित होते.
अहिराणीचे योगदान मोठे
अहिराणी साहित्यिक क्षेत्रातील प्रवासात माझ्या सहचारिणीचे योगदान हे मोठे आहे. तिच्यामुळे मला प्रत्येक टप्प्याट प्रोत्साहन मिळत गेले. परंतु, तिच्या अंगात जेव्हा कवीता संचारते तेव्हा माझ्या जवळ असलेले कवी, साहित्यिक हे अक्षरश: पळत सुटतात, असे सांगताच सभागृहात एकच हंशा पसरला. पुढे अहिरे यांनी अहिराणी भाषेतून रामायण लिहण्यामागची भूमिकाही येथे स्पष्ट केली. ज्ञानाची कक्षा वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सभोवतालचे निरीक्षण, अवांतर वाचन केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
आई माझे विद्यापीठ
आमच्या घराण्यात ग्रंथ, पुराण या प्रकारचा एकही वारसा नव्हता. लहानपणाच्या काळात बारा बलुतेदार ही व्यवस्था होती. माणूस जात बंधनात अडकलेला होता. ही विषमता पाहून सर्वात प्रथम कागदावर कविता लिहिली. त्यानंतर मात्र, माझे कवीता वअहिराणी भाषेतील साहित्य हे घडतच गेले. माझ्यातील साहित्यिक घडविण्यात आईचा वाटाही मोठा आहे. आई म्हणजे माझे विद्यापीठच होते असे आवाहन अहिराणी साहित्यिक अहिरे यांनी येथे केले.
आज समारोप
जि.प.च्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत आयोजित ‘धुळे ग्रंथोत्सव 2017-2018’ निमित्ताने मंगळवारी सकाळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सुरेख कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. उत्तरोउत्तर रंगलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी नाटीका, भारूड, देशभक्तीपर गीत गायन करीत सभागृहात उपस्थित रसिकांची मनेही जिंकली. दरम्यान, धुळे ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप होणार आहे.