गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई;28 लाखांचा मुद्देमाल जप्त
नवापूर। देश व राज्य कोरोनाच्या संकटातून जात असताना दुसरीकडे नवापूर तालुक्यात दारू तस्करी होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
नवापूर तालुक्यातील झामणझर गावातून गुजरात राज्यात छुप्या मार्गाने दारूची तस्करी सुरु असतांना गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. गुजरात राज्यात दोन गाड्या, एक टेम्पो अवैध जॅकपाॅट बडीशेप देशी दारूचे 360 देशी संत्रा दारूचे बाॅक्स भरून जात असताना झामणझर गावात तिन्ही वाहनातील दारू जप्त करून कारवाई केली. मद्यसाठा नवापूर पोलीस ठाण्यात आणला आहे. महाराष्ट्र राज्यातून दारू खरेदी करून गुजरात राज्यात येथे अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. लाॅकडाऊन दरम्यान गुजरात राज्यात दारू वाढती मागणी वाढल्याने दारू तस्करीला उत आला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, महेंद्र नगराळे, शांतिलाल पाटील, दादाभाई वाघ, जितेंद्र तोरवणे यांच्या टिमने मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांना याबाबत काहीच भनक नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बुधवारी रात्रीच्या तीन वाजेच्या सुमारास गुजरात राज्यात दारू तस्करी होणार असल्याची गोपनिय माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. दोन गाडी एक टेम्पो भरून दारू तस्करी करणार्या पकडले. असा 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिल मनोहर जवंजाळ (वय 42, शेफाली पार्क), अशोक लोटन मराठे (वय 50, रा.दयाल नगर, सी.बी गार्डन नंदुरबार) यांना ताब्यात घेतले आहे.आरोपी मुन्ना गामित (रा. व्यारा) दोन चालक फरार असून नंदुरबार जिल्हा पोलीस शोध घेत आहेत.कोरोनामुळे सर्व लाँकडाऊन असतांना दुसरीकडे लाँकडाऊनचा फायदा घेत नवापूर तालुक्यातुन गुजरातमध्ये दारूची तस्करी वाढली आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.