जळगाव । शेतीखरेदीच्या 7/12 रेकॉर्डला नोंद घेण्यासाठी चार हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी सोमा भिला बोरसे (वय 51) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली होती. याप्रकरणी मंडळ अधिकार्यास सोमवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर 1 लाखांच्या जातमुचलक्यावर सोमा बोरसे यांना जामीन मंजूर करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथे तक्रारदाराने शेतजमीन घेतली होती.
या शेतजमिनीची 7/12 रेकॉर्डला नोंद घेण्यासाठी त्यांनी मेहुणबारे येथील तलाठ्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली होती. तसेच तलाठ्यांनी 7/12 रेकॉर्डला नोंदही घेतली होती. त्यानंतर ही नोंद मंजूर होण्यासाठी प्रकरण मेहुणबारे येथील मंडळाधिकारी सोमा बोरसे यांच्याकडे पाठवले होते. त्यांनी चार हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी एसीबीच्या पथकाने शुक्रवारी बोरसे यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपली असता लाचखोर बोरसे याला न्या. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात येवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. बोरसे यांच्यातर्फे जामीनासाठी अर्ज दाखल केला असता त्यावर कामकाज होवून बोरसे यांना 1 लाखाच्या वैयक्तीय जातमुचलक्यावर तसेच अटी शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यात चार्जशिट दाखल होत नाही तो पर्यंत तिरपोळे गावात जावू नये, तसेच कार्यालयातही जावू नये, काही महत्वाचे काम असल्यास नायब तहसिलदारांच्या उपस्थित ते काम करावे, तर दर बुधवारी हजेरी लावावी या अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.