जळगाव । शासनाच्या मंजूर निधीमधून चार टक्क्यांप्रमाणे 1 लाख 82 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी शुक्रवारी यावल वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सूर्यकांत चावदस नाले याला रंगेहात पकडण्यात आले. नाले याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला अतिरीक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितातर्फे जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला. मात्र जामिनावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याने त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
घरी बोलावून लाच स्विकारली!
तक्रारदार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी डिसेंबर 2016 ते मार्च 2017 पर्यंत वनपरिक्षेत्रात विविध शासकीय कामे केलेली होती. या कामांचा 50 ते 55 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन तो यावल वनविभागाला मिळाला होता. या मंजूर निधीच्या चार टक्के प्रमाणे कामाचा खर्च वगळून 1 लाख 73 हजार रुपयांची लाच नाले याने मागितली होती. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकार्याने गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून शुक्रवारी भूषण कॉलनीतील घरी नाले यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. न्यायाधीश हंकारे यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर संशयीतातर्फे अॅड. अकील इस्माईल यांनी जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला. त्यावर सरकारपक्षातर्फे अॅड. मोहन देशपांडे यांनी खुलासा सादर केला. जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नाले याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.