धुळे अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल ; खाजगी पंटरालाही झाली शिक्षा
धुळे- दोंडाईचा बसस्थानकात दुकानासाठी जागा मिळण्यासाठी बयाणा रक्कम भरणार्या ईसमास काही कारणास्तव जागा मिळाली नव्हती मात्र ही रक्कम परत मिळण्यासाठी तत्कालीन वाहतूक निरीक्षक निंबा मंगलसिंग ठाकूर यांनी खाजगी पंटर विठ्ठल बाबूराव साळुंखे (दोंडाईचा, ता.शिंदखेडा) यांच्या माध्यमातून 20 हजारांची लाच स्वीकारली होती. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक ए.बी.वडनेरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती. धुळे सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकारतर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील अॅड.अजय सानप यांनी युक्तीवाद केला तसेच धुळे एसीबीतर्फे पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस नाईक प्रकाश सोनार यांनी बाजू मांडली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी तीन वर्ष शिक्षा व 40 हजारांचा दंड सुनावला. दरम्यान, भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास वा कुणी लाच मागत असल्यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 02562-234020 तसेच 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर यांनी केले आहे.