लाच घेताना महापालिकेचा कनिष्ठ लिपिक सापडला

0

कर पावती देण्यासाठी घेतले दोन हजार

पिंपरी-चिंचवड : फ्लॅटचे हस्तांतर करून कर पावती देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालयातील कर संकलन विभागातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात अडकला. अमोल चंद्रकांत वाघिरे (वय 38, रा. धोंडिबा वाघिरे चाळ, पिंपरी गावठाण, पिंपरी, पुणे) असे त्याचे नाव आहे. याबाबत 45 वर्षीय एका इसमाने तक्रार दिली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई दुपारी तीनच्या सुमारास केली.

तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटचे पत्नीच्या नावाने हस्तांतरण करून कर पावती देण्यासाठी आरोपीने दोन हजार रुपये मागितले होते. याबाबत लाचलुचपत विभागाच्या पुणे विभागाने कारवाई केली असून कनिष्ठ लिपिकास दोन हजारांची लाच स्वीकारताना पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालयात आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक एस एस घार्गे, डी. वाय. एस. पी. दत्तात्रय भापकर, पोलीस हवालदार खान, पोलीस नाईक विनोद झगडे यांनी केली.