10 जिवंत काडतुस जप्त ; मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी, तिघे पसार
मुक्ताईनगर- तालुक्यातील जोंधनखेडा ते लालगोटा दरम्यानच्या रामू वंजारी यांच्या शेताजवळ गावठी कट्ट्यासह बिहारातील संशयीतास पकडण्यात आले तर त्याचे तीन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपीच्या ताब्यातून 10 जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई 13 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, बिहारातील संशयीत या भागात येण्यामागे नागमणीचा व्यवहार असल्याची शक्यता आहे त्याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
गुप्त माहितीनुसार कारवाई
पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. संशयीत आरोपी बद्रीदास नरगेश्वरदास उर्फ भुवनेश्वरदास (40) यास अटक केली तर त्याचे साथीदार राजा बाबू, रवी व रवी (पूर्ण नाव माहित नाही) व त्यांचा एक मित्र (नाव माहित नाही, सर्व रा. कुर्मामा, ता.कोच,जि.गया, बिहार) पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपींविरुद्ध भगवान पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.