लालूंचा निकाल शनिवारी!

0

चारा घोटाळा : निकालाला तारीख पे तारीख

नवी दिल्ली : चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात येणार्‍या शिक्षेचा निकाल पुन्हा लांबला आहे. विशेष सीबीआय न्यायालय शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाचा निकाल सुनावणार आहे. यापूर्वी दोनदा लालूंच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

कमीत कमी शिक्षा करण्याची विनंती
न्यायालयाने मागील शनिवारी झालेल्या सुनावणीत त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. तब्बल 21 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच 69 वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी दोनदा टळली होती. त्यामुळे लालूंना काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा लालूंची शिक्षा टळली. दरम्यान लालूंनी माझ्या प्रकृतीचा विचार करून कमीत कमी शिक्षा करावी, अशी विनंती न्यायाधीशांना केली आहे. राजदने यापूर्वीच न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले जाईल आणि राजकीय संघर्षही सुरूच राहील, असे जाहीर केले होते.

गैरव्यवहारावरून 38 जणांवर आरोपपत्र
चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून 1991 ते 1994 या वर्षांत 89 लाख 27 हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता. पाटणा उच्च न्यायालयाने 1996मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. 27 ऑक्टोबर 1997 ला देवघर कोषागारातील गैरव्यवहारावरून 38 जणांवर आरोपपत्र दाखल झाले होते. त्यातील 11 जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला, तीनजण साक्षीदार बनले तर 2006-07मध्ये दोघांनी गुन्हा स्वीकारून शरणागती पत्करली. लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी तीन प्रकरणे दाखल आहेत. त्यात दुमका कोषागारातून 3.97 कोटी रुपयांचा, छैबासा कोषागारातून 36 कोटी रुपयांचा आणि दोरांदा कोषागारातून 184 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.