मुख्यमंत्र्यांची सहानुभूती; अर्ज मंजूर करण्याचे आदेश
मुंबई : बीडमधील एका महिला कर्मचार्याने लिंग बदल करुन पुरुष होण्यासाठी वरिष्ठांकडे अर्ज केला होता. हा अर्ज पोलिस महासंचालकांनी फेटाळून लावला होता. महिला म्हणून पोलिस दलात निवड झाल्याने पुरुष होण्यासाठी लिंग बदल करता येणार नाही, असे कारण देण्यात आले होते. आता या प्रकरणी महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रिया केल्यानंतरही आपल्याला पोलिस दलात नोकरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ललिता साळवेने याचिकेत केली. आता या प्रकरणात साळवे यांच्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येवून अर्जाला मंजुरी देण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
शस्त्रक्रियेसाठी मागितली होती रजा
बीड जिल्हा पोलिस दलात कार्यरत एका महिला कर्मचार्याने पोलिस अधीक्षकांकडे लिंग बदलासाठी परवानगी व शस्त्रक्रिया करण्यासाठी सुटीचा अर्ज केला होता. पहिल्यांदाच अशा प्रकारचा अर्ज आल्याने अधीक्षक जी. श्रीधर यांनी निर्णयास्तव हा अर्ज विशेष पोलिस महानिरीक्षक व महासंचालकांकडे पाठविला होता. यासंदर्भात पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी संबंधित महिला कर्मचार्यास लिंग बदल करता येणार नाही, असे पोलिस अधीक्षक श्रीधर यांना कळविले. दरम्यान, सदर महिला कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून आपल्याला लिंग बदलाची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. शरीरात बदल होऊ लागल्याने सदर महिला कर्मचारी रुग्णालयात गेली. मात्र, स्थानिक डॉक्टरांनी मुंबईतील डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. 23 जूनरोजी मुंबईतल्या जेजे रुग्णालयात या महिला कर्मचार्याची हार्मोन आणि शारीरिक चाचणी झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 17 सप्टेंबररोजी तिने लिंग बदलण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला. अशा कारणासाठी पहिल्यांदाच अर्ज आल्याने अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता.
नोकरीवर गंडांतराची शक्यता
ललिता साळवेची निवड महिला गटातून झाल्याने नोकरीवर गंडांतर येऊ शकते, असे अधीक्षक कार्यालयाकडून तिला कळविण्यात आले होते. मात्र लिंग बदलानंतर पुन्हा शारीरिक चाचणी घेऊन त्यांना पोलिसामध्ये राहता येईल, असा दावा तिच्या वकिलांनी केला होता. अहमदाबादमध्येही अशी घटना घडल्याचा संदर्भ त्यांनी दिला होता. पण, या महिला कर्मचार्याची महिला गटातून पोलिस दलात निवड झाली आहे. त्यामुळे लिंग बदलानंतर या महिलेला नोकरीला मुकावे लागेल, असे पोलिस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले, त्यामुळे नोकरीवरील हक्क मागण्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय ललिता साळवेकडे पर्याय उरला नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिले मदतीचे आश्वासन
आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक माथूर यांना आदेश दिले आहेत की, ललिताच्या अर्जाला मंजुरी द्यावी. फडणवीस यांनी सांगितले की, मी डीजीपी यांना या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यास सांगितले आहे. यामुळे काही तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित होऊ शकतात. मात्र, त्यात गरजेनुसार बदल करावे लागतील. मला आशा आहे की, संबंधित महिलेला तिच्या इच्छेनुसार जगता येईल.