जळगाव : विवेकानंद नगरातील एका रुग्णालयाच्या इमारतीमध्ये लिफ्ट उभारण्याच्या कामात डॉक्टरांची तीन लाखात फसवणूक करण्यातआली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार येथील विरॉन लिफ्ट अॅण्ड सर्व्हिसेसचा प्रोप्रायटर विकेश पाटील व सेल्स इंजिनिअर ऋषिकेश पाटील अशी फसवणूक करणार्यांची नावे आहेत.
जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात डॉ.तुषार चंद्रकांत नेहते (रा.विवेकानंद नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एप्रिल 2018 मध्ये त्यांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना नंदुरबार येथील विरॉन लिफ्ट सर्विसेसचे प्रोप्रायटर विकेश पाटील व सेल्स इंजिनिअर ऋषिकेश पाटील यांनी नेहते यांच्याशी लिप्ट बसवून देण्याबाबत संपर्क साधला होता. दोघांनी नेहते यांना चार लाख 80 हजार रूपयांचे कोटेशन दिले. त्यानुसार डॉ.नेहते यांनी 90 हजारांचा चेक अॅडव्हान्स (आगावू) दिला. त्यानंतर लिफ्टच्या कामाला सुरूवात झाली. पुन्हा पैशांच्या मागणीनुसार नेहते यांनी विकेश व ऋषिकेश यांना 25 जुलै 2018 रोजी आगाऊ रक्कम म्हणून दोन लाख 46 हजार रूपये दिले. त्यानंतर लिफ्टचे काम करण्याची विनंती करूनही दोघांनी काम केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ.नेहते यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी नंदुरबार येथील विरॉन लिफ्ट अॅण्ड सर्व्हीसेसचा प्रोप्रायटर विकेश पाटील व सेल्स इंजिनिअर ऋषिकेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक किशोर पवार करीत आहे.