मुंबई: इंडियन प्रिमियर लीग साठी चार फेब्रुवारी रोजी होणार्या खेळाडू लिलावांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हे लिलाव २६ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बीसीसीआयने या लिलावांची नक्की तारीख अद्यापी जाहीर केलेली नाही. गेल्या नोव्हेंबरमध्ये आयपीएल आयोजन परिषदेने आयपीएल २०१७ साली ५ एप्रिल ते २१ मे अशी तारीख ठरविली होती व त्यासाठीचे लिलाव ४ फेब्रुवारीला होणार होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविल्याने व सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयवर प्रशासक नियुक्ती करण्यास विलंब झाल्याने आयपीएलसाठीचा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याची माहिती आहे. भारतीय संघ कोहलीच्या नेतृत्वात जबरदस्त फार्मात असून भारतीय संघातील खेळाडू देखील चांगल्या फार्मात असल्याने विदेशी खेळाडूंपेक्षा जास्त भाव भारतीय खेळाडूंनाच मिळण्याची शक्यता आहे.
खेळाडूंचा लिलाव यंदा मुंबईत!
आयपीएलच्या यंदाच्या पर्वासाठीची तयारी लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. आयपीएलमधील संघांमध्ये लवकरच आपल्या संघात सर्वोत्तम खेळाडू समाविष्ट करून घेण्यासाठीची चढाओढ होणार आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि यंदाचा लिलाव मुंबईत होणार असल्याचेही समजते. गेल्या तीन वर्षांपासून खेळाडूंचा लिलाव बंगळुरूत करण्यात आला होता. पण यावेळी लिलावाच्या कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आयपीएलच्या स्पर्धेचे पहिले पर्व मुंबईतून सुरू झाले होते. २००८ साली मुंबईत आठ संघांसाठी खेळाडूंचा लिलाव झाला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती
पुढील वर्षी गोव्यात लिलाव करण्यात आला, मग २०१० साली पुन्हा एकदा मुंबईत लिलाव घेण्यात आला. त्यानंतर आजवर आयपीएलच्या एकाही पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत झाला नाही. बंगळुरूत आतापर्यंत आयपीएलच्या पाच पर्वांसाठी खेळाडूंचा लिलाव झाला होता. ‘क्रिकेटनेस्ट’ला आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय यंदा आयपीएलचा लिलाव पुन्हा एकदा मुंबईत आयोजित करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयचे मुख्यालय आणि काम करण्यात सहजता येईल, यासाठी खेळाडूंचा लिलाव मुंबईत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
बीसीसीयच्या गोंधळामुळे उशीर
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविल्याने व सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयवर प्रशासक नियुक्ती करण्यास विलंब झाल्याने आयपीएल साठीचा निर्णय घेण्यास उशीर होत आहे. सीईओ राहुल जौहरी यांच्या मते अजूनही हे लिलाव ४ फेब्रुवारीला होऊ शकले असते मात्र देशात सध्या स्थानिक टी २० सामने सुरू आहेत ते १८ फेब्रुवारीला संपणार आहेत. या सामन्यातूनही काही टॅलेंट खेळाडू शोधण्यास मदत होईल म्हणून लिलाव नंतर होतील. यंदा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, के.एल.राहुल यांच्यासमवेत आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर यांना अधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे.