मुंबई । सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरली आहे. आयपीएलमुळे बीसीसीआयची जगभरातील ताकद आणखीनच वाढल्यामुळे बीसीसीआयची आयसीसीवरही हुकूमत पाहायला मिळत आहे. मात्र, या आयपीएलमुळे बीसीसीआयच्या कमाईचा आकडा वाढता वाढत चालला आहे. ही कमाई किती आहे, हे ऐकलं तर तुम्हाला धक्काच बसेल. आयपीएल या जगातील सर्वाधिक पाहिल्या जाणार्या क्रिकेट स्पर्धेमुळे बीसीसीआयला तब्बल 12 हजार कोटींचा नफा झाल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या स्थापनेपासून बीसीसीआयने 3500 कोटींचा करही आयकर विभागाकडे भरला आहे.
बीसीसीआयने भरला 3500 कोटींचा कर
आयपीएल ही मनोरंजनपर स्पर्धा असल्यामुळे केंद्र सरकारने बीसीसीआयला करात कोणतीही सवलत दिलेली नाही. असे असले तरी आयपीएलची कमाई मात्र विराट कोहलीच्या फटकेबाजीसह बहरत आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, बीसीसीआयला 12 हजार कोटींचे उत्पन्न आयपीएलमधून मिळाले आहे. त्यातील 30 टक्के म्हणजेच 35 हजार कोटींचा कर बीसीसीआयने भरला आहे.
तरीही हवी करात सवलत
आयकर विभागाने बीसीसीआयकडून 30 टक्के कर आकारला आहे. याला आव्हान देण्यासाठी बीसीसीआयने मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल केली असून, करात सवलत मिळावी, यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. बीसीसीआयने जानेवारी महिन्यात 2013-14 सालासाठीचा 100 कोटी रुपये कर भरला आहे. मात्र, उर्वरित रकमेसाठी स्थगिती मिळवण्यात बीसीसीआयला यश मिळाले आहे.