जळगाव। तालुक्यातील खेडी खुर्द येथे शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास झालेल्या हाणामारी व लुटमार यामागे अवैध वाळूचे कनेक्शन असल्याचे तालुका पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. फुपनगरी येथील गिरणा नदीपात्रातील वाळूच्या ठेक्यावरुन दररोज एका ट्रॅक्टरद्वारे विना पावती वाळूची वाहतूक करु द्यावी यासाठी कन्हैय्या उर्फ अशोक नामदेव सोनवणे (वय 35 रा.खेडी खुर्द) याने त्याच्या घरासमोरच शंकर पुंडलिक ठाकरे (वय 30,रा.वाल्किम नगर) याच्या मदतीने वाळूचे वाहने अडवून धुडगूस घातल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. हा संपूर्ण प्रकाराचा उघड पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. दरम्यान, अटकेतील दोघांना न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशी घडली होती घटना
फुफनगरी येथील वाळू ठेक्यावर विलास यशवंते, लकीराम जेठाणी आठवडाभरातील उधारीची वसुली शनिवारी संध्याकाळी पुर्ण झाली. नेहमी प्रमाणे सुनील मंत्री यांच्या यांच्या व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी त्यांचा मुलगा यश सुनील मंत्री होंडासीटी कार घेवुन ठेक्यावर आला होता. संध्याकाळी सहाला होंडासीटी कार क्र (एमएच 19- सीडी 9990) घेऊन यश मंत्री व चालक दीपक रामदास ओतारीसमवेत पैसे घेऊन खेडी मार्गे जळगावला येत असतांना. खेडी गाव रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेजवळ पांढर्या रंगाची इंडिका कार (एमएच 15- बीडी 3717) रस्त्यावर आडवी लावून अशोक नामदेव सोनवणे ऊर्फ कन्हैया(रा.खेडी),शंकर ठाकरे(शनिपेठ) या दोघांनी यश मंत्रीच्या गळ्याला तलवार लावून 4 लाख 47 हजार 550 रुपये रोकड असलेली बॅग मागील सिटवरुन हिसकावुन पोबारा केला. पळून जातांना चालकाचा इंडीका कारवरील ताबा सुटला व ओल्या शेतात जावुन कार चिलात रुतली. दोघांनी तिसर्या साथीदाराला बोलावुन पोबारा केला होता.
अवघ्या पाच तासात अटक
ट्रिपलसीट दुचाकीवर शिवाजीनगर उड्डाण पुल मार्गे लूटारू चित्रा चौक, तेथून निलमवाईनच्या गल्लीतून पुढे जुने जळगावकडे रवाना झाले. तो पर्यंत शहरात घटनेची माहिती मिळून डीवायएसपी सचिन सांगळे यांनी तत्काळ डीबी पथकांना पाचारण करुन लूटारुचा शोध घेण्याच्या सुचना केल्या. दोघांचे नाव निष्पन्न झाल्याने पोलिस पथके त्यांच्या घरावर शनिपेठेत चकरा मारत असल्याची माहिती मिळताच दोघांनी तेथून पळ काढत शिरसोली रोडचा मार्ग धरला. मात्र पोलिसांच्या हालचालींचा अंदाज येवुन त्यांनी माघार घेत औद्योगीक वसाहत मार्गे पुन्हा कालिंका माता मंदिर मार्गे आसोदा रोडकडे मार्ग धरला. कुठे जायचे या विवंचनेत असतांनाच पोलिस कर्मचारी भास्कर पाटील, विजयसींग पाटील, दुष्यंत खैरनार, प्रीतम पाटील, प्रणेश ठाकुर यांनी कालींका माता मंदिरा जवळ रात्री 11.30 वाजता दोघांवर झडप घातली. अवघ्या पाच तासातच त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
अन् घडले भलतेच…
कन्हैया याची पत्नी खेडी खुर्द येथे ग्रामपंचायतीत सदस्य आहे. फुपनगरी नदीपात्रातून जाणारे वाळूचे वाहने हे कन्हैय्या याच्या घरासमोरुन जातात. या ठिकाणाहून कन्हैया याच्या नावावर एक ट्रॅक्टर सुरु होते. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या वादामुळे ठेका बंद झाल्याने वाळू वाहतूक बंद झाली होती, त्यामुळे कन्हैय्याच्या नावावर चालणारे ट्रॅक्टरही बंद झाले होते. आता वाळू वाहतूक सुरु असताना कन्हैयाचे ट्रॅक्टर मात्र बंद होते. हे ट्रॅक्टर पुन्हा सुरु व्हावे यासाठी त्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, मात्र झाले भलतेच.