जळगाव। खासगी हौसिंग फायनान्स कंपनीच्या कर्मचार्याला चाकूचा धाक दाखवून 13 हजार 500 रुपये लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी 5 वाजता कानळदा रस्त्यावरील शेतात घडली. या प्रकरणी रविवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून एका संशयीताला अटक केली होती.
त्याला सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 22 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खासगी फायनान्स कंपनीचा वसुली कर्मचारी प्रशांत लक्ष्मण पाटील (वय 30, रा. मुक्ताईनगर) याने शनिवारी एका कर्जदाराकडून 13 हजार 500 रुपये घेतले. त्याच दिवशी त्याला त्याचा जुना मित्र वसीम शेरअली तेली (वय 32, रा. सालारनगर) हा भेटला. तो प्रशांत सोबत 8 ते 9 वर्षापुर्वी एका ट्रान्सपोर्टमध्ये एकत्र काम करीत होते. त्यामुळे दोघांची ओळख आहे. वसीम याने प्रशांत याला गेंदालाल मील परिसर सोडून देण्याचे सांगितले.