लूट करणार्‍या आरोपींचा दिल्ली पोलिसांनी घेतला ताबा

0

चाकूच्या धाकावर केली होती 12 लाखांची लूट

भुसावळ : चाकूच्या धाकावर नवी दिल्ली येथे 12 लाखांची लूट करून अप कुशीनगर एक्स्प्रेसने शिर्डी येथे पसार होणार्‍या चारही आरोपींच्या लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने पाचोर्‍यासह रावेरातून मुसक्या आवळल्या होत्या. सोमवारी चारही संशयीतांना दिल्ली येथील पोलीस पथकाने चाळीसगाव व भुसावळातून ताब्यात घेतले. नवी दिल्ली येथे विक्रम शाहू हे बॅकेत भरणा करण्यासाठी जात असतांना हरविंदरसिंग किशोरलाल ठाकूर, राकेशकुमार कोळी, जसविरसिंग बेनीवार (सर्व रा. नवी दिल्ली) व वासूदेव घोष यांनी चाकूचा धाक दाखवून शाहू यांच्याकडून 12 लाख रूपयांची लूट केली होती.

या प्रकारानंतर ते शिर्डीकडे कुशीनगर एक्स्प्रेसने रवाना झाले. त्यातील वासुदेव घोष याला रावेर तर अन्य तीन जणांना पाचोरा येथे कृषीनगरच्या एस- 7 या डब्यातून लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत दिल्ली येथील गोविंदपूरी पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक सोमवारी भुसावळ व चाळीसगाव येथे दाखल झाले. त्यांनी चारही जणांना ताब्यात घेतले. चारही संशयीतांकडून चार लाख रूपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली होती, ती रितसर पंचनामा करून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली. कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पार पडल्यावर दिल्ली पोलिस पथकाने चारही संशयीतांना घेत दिल्ली कडे रवाना झाले. यावेळी जीआरपी निरीक्षक दिलीप गढरी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी चर्चा करून जीआरपी व आरपीएफने केलेल्या कामाचे कौतुक केले.