जळगाव। शहरातील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर व विजयकुमार जैन व्हेंचर गृप यांनी ममुराबाद पुलाखालून वाहणार्या लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवून सर्वे नंबर 507/1 व 507/2 मध्ये बेकायदेशीर बांधकाम केले असल्याची तक्रार अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती. अॅड. पाटील यांच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी नगररचना विभागातील संबंधीत अभियंत्यांना प्रत्यक्ष पहाणीकरून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, नगररचनामधील संबधीत अभियंत्यांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला नव्हता. यात नगररचना विभागातील इंजिनिअर्स यांचे संबंधीत बिल्डर्स सोबत हितसंबध असल्याने वस्तुस्थितीदर्शक अहवाल दिला नाही असा आरापे अॅड. पाटील यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केला आहे.
अभियांत्यांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल न दिल्याने बुधवार 3 मे रोजी तक्रारदार अॅड. विजय भास्करराव पाटील यांच्यासह आयुक्त जीवन सोनवणे, नगररचनाकार श्री. बागुल, अभियंता विजय मराठे, इस्माईल शेख यांनी लेंडी नाल्याची पहाणी केली. या पहाणीदरम्यान तक्रारदार अॅड. पाटील यांनी लेंडी नाल्याचा नैसर्गीक प्रवाह बदलल्याची बाब, तसेच मुळ नैसर्गीकरित्या वाहणारा नाला भराव टाकून बुजल्याची बाब व नाल्याची बदललेली दिशा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आयुक्तांनी नगररचना विभागातील अभियांत्यांना वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.