साहित्य माणसाला जिवंत ठेवते
साहित्य हे एका अर्थाने समाजाचे जीवनसत्त्व असते, जो समाज हे सत्त्व जागरूकतेने व नीर-क्षीर विवेकी न्याय लावून टिपतो आणि मनात रुजवून घेत विचार करतो व प्रश्न विचारू लागतो, तो समाज निरोगी व प्रगतिशील राहतो. जेव्हा समाज आणि साहित्याची नाळ तुटते, तेव्हा असा समाज हा हतबल व एका अर्थाने कुरूप होत जातो. ही त्या समाजाच्या अध:पतनाची सुरुवात असते. कारण तो साहित्यातून संवेदनशीलता घेत नसल्यामुळे मूकबधिर झालेला असतो. पण हीच वेळ असते व हाच काळ असतो, जेव्हा लेखकांनी-कलावंतांनी अधिक जबाबदारीने लेखन करून समाजाचा आवाज बनावा, त्याचे आत्मभान जागृत करावे आणि त्याला दिलासा द्यावा की, त्याचं दु:ख, त्याचं शोषण एक ना एक दिवस संपणार आहे. व्यापक अर्थाने साहित्य सामान्य माणसाची जीवनावरची श्रद्धा डळमळू न देता जिवंत ठेवतो.
आज अनेकजण दरवर्षी भरणार्या शतकी परंपरा असलेल्या साहित्य संमेलनाला उरूस वा जत्रा म्हणत टीका करतात, त्याला 1921 सालीच न. चिं. केळकरांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे, तेही आज सर्व उपस्थित रसिकांना त्यांच्याच शब्दात सांगत या टीकाकारांना मी उत्तर देऊ इच्छितो. वाङ्मयग्रंथकार हे तर स्वयंभूच असतात. एका ग्रंथकाराने म्हणले आहे की, ‘Literary men have neither ancestors nor posterity; they alone compose their whole race. ग्रंथकारांना कुलपरंपरा किंवा वतन नसले तरी नि:स्वार्थी बुद्धीने परोपकारच त्यांच्या हातून घडत असतो. त्यांनी वाङ्मयाची उपासना नित्य चालू ठेवली पाहिजे. साहित्य संमेलन हे या उपासनेतले एक वार्षिक व्रत आहे. या व्रतानुष्ठानात एक वेळाही खंड न पडू देण्याचा आपला निश्चय असल्यास तो तडीस जाणे कठीण नाही. आपण सारे साहित्य रसिक याचे पालन करत स्वतंत्र भारतात खंड न पडू देता वार्षिक संमेलने भरवत केळकरांच्या अपेक्षांची व त्यांच्या माध्यमातून मायमराठीच्या उपासनेची पूर्तता करत आहोत, अशीच माझी भावना आहे. 1932 मध्ये कोल्हापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खुद सयाजीराव गायकवाड महाराज होते. त्यांनी आपल्या भाषणात वाङ्मय म्हणजे मनुष्याच्या मुखातून बाहेर पडलेली जी वाचा तिचा संग्रह अशी वाङ्मयाची एक सर्वमान्य होणारी व्याख्या केली होती. त्यांना ज्ञानाधिष्ठित विवेकी व सुसंस्कृत समाज घडवायचा असल्यामुळे त्यांच्या भाषेत सांगायचे झाले, तर भावनात्मक (म्हणजे ललित) वाङ्मयापेक्षा बौद्धिक (ललितेतर- ज्ञानमाहितीपर साहित्य) वाङ्मयाला त्यांनी अधिक प्रोत्साहन दिले, त्या काळी समाजाला प्रथम साक्षर, मग वाचक आणि तद्नंतर ज्ञानसंपन्न करण्यासाठी ललितेतर साहित्यास प्राथमिकता असणे यथायोग्यच होते. या भाषणाच्या शेवटी महाराजांनी मराठी वाङ्मय परिषद व साहित्यकारांनी काही मौलिक सूचना केल्या, त्या अशा होत्या.
1) लोकांस सुविचार व सद्भावनापोषक असे वाङ्मय हवे आहे. ज्ञानाने व अंत:करणाने आपले लोक सुधारलेल्या देशातल्या सारखे संपन्न होतील. आपल्या सर्व संस्था तर्काच्या पायावर उभ्या राहतील; राष्ट्रैक्याच्या व बंधुत्वाच्या कल्पनांचे बीजारोपण लोकांत होईल आणि अशा रीतीने एक राष्ट्ररचनेस प्रारंभ करत अशाच प्रकारचे वाङ्मय निर्माण करण्याकडे लेखकांनी लक्ष द्यावे व ते प्रकाशित करण्याचे काम साहित्य परिषदेने हाती घ्यावे. 2) पाश्चात्त्य लेखक व विचारवंतांचे तसेच अर्थशास्त्र, नीती, राजकारण, विद्युतशास्त्र यांसारखी शास्त्रे, स्थापत्य, चित्र वगैरे कला यांवरील अभिज्ञ ग्रंथकारांच्या पुस्तकांची मराठीत भाषांतरे करवणे हे स्वभाषाअभिमानी व राष्ट्राभिमानी विद्वानांचे कर्तव्य आहे. 3) पाश्चात्त्य संदर्भ ग्रंथांवर देशीकार लेणे चढवणे किंवा त्यांच्या धर्तीवर स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध करणे जरुरी आहे. 4) लेखकांनी संस्कृतप्रचुर अवघड भाषेत न लिहिता खेडवळांनाही समजेल अशा सरळ भाषेत लिहिण्याचा परिपाठ ठेवावा. 5) ज्या पुस्तकांनी विचारात क्रांती घडवून आणली असेल, त्यांची भाषांतरे स्वभाषेत व्हावीत. स्वतंत्र लेखन करण्यासारखी प्रतिभा नसेल, त्यांनी चांगली भाषांतरे करण्याकडे लक्ष द्यावे. श्रोते हो, महाराजांनी मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, आपल्या सर्व संस्था तर्काच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि राष्ट्रैक्य व बंधुतेच्या कल्पनांचे बीजारोपण व्हावे, संदर्भ ग्रंथ विपुल निर्माण व्हावेत व उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर होऊन मराठी अधिक संपन्न व्हावी अशी त्या काळी जी अपेक्षा व्यक्त केली, त्यानंतर एवढा प्रदीर्घ काळ लोटला असला तरी आपली मराठी किती प्रमाणात ज्ञानभाषा झाली आहे, याचे आपण सार्यांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे. महाराजांचे हे भाषण प्रमाण मानून आपण सार्यांनी या दिशेने अधिक भरीव प्रयत्न केले पाहिजेत, हे नक्की! आज एकविसाव्या शतकातले जग स्फोटक बनले आहे. गरिबी, मूल्यांचा र्हास, दहशतवाद, क्रौर्य आणि सत्तेमुळे होणारी दडपशाही यामुळे सामान्य माणूस निराश, हतबल व कुंठित झाला आहे. त्याला स्वर देत आत्मभान मला देता येईल का, व त्याचा जगण्याचा विश्वास अंशमनाने का होईना वाढवता येईल का, हा माझा सततचा प्रयत्न राहिला आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं, तर इंडिया विरुद्ध भारत हा संपन्नता विरुद्ध अभाव, विकृतीच्या टोकापर्यंत पोचलेला सुखभोग विरुद्ध भूक, बेकारी आणि आत्महत्येपर्यंतची निराशा व संपलेपणाचा विषम संघर्ष आहे. तो आपल्या लेखनातून प्रकट होताना वाचकांना मी काय देऊ शकतो, याचे मी सातत्याने भान बाळगत आलो तसेच हॅव नॉट म्हणजेच नाही रे वर्गाची बाजू घेत त्यांच्या कथा लिहिणे ही पण माझी एक स्वाभाविक प्रेरणा आहे तसेच ते विचारपूर्वक बनवलेले तत्त्वज्ञान आहे. मात्र, त्यासाठी कोणताही एक इझम वा तत्त्वज्ञान हा मानवी कल्याणाचा अक्सीर रामबाण इलाज आहे, असे मी मानत नाही.
माझा असेल इझम तर तो नि:संशयपणे निखळ मानवतावाद आहे. मी स्वत:तला आजच्या काळाचा म्हणजेच समकालीन लेखक मानतो. जेव्हा टीकाकार मला समकालीन लेखक म्हणतात, ती माझ्यासाठी सकारात्मक कॉम्प्लिमेंट आहे, असे मी मानतो. हे माझ्यासाठी सहजतेने घडत गेले असे वाटते. मराठी वाचकांना पुराण-इतिहासात रमायला आवडते. राजकीय नेते हे जाणूनबुजून मतपेटीसाठी पुनरुज्जीवनवादाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जुन्या काळचे व त्या काळच्या नायकांना देवत्व बहाल करणारे पोलिटिकली करेक्ट लेखन बरेच होत आहे. दुसरा लेखनाचा प्रकार म्हणजे नॉस्टॅल्जिक होत गेलेल्या लेखनाचा. साहित्य हे समाजातून माणसाचे दु:ख, शोषण, व्यथा-वेदना आणि समाज व्यवस्थेतले त्याचे पिचले जाणे आणि धर्म-राजकारण-सत्तेसोबतचा संघर्ष आदीं जीवनद्रव्ये घेतो आणि आपल्या प्रतिभेने त्याची पुनर्रचना करून समाजापुढे आरशासारखा ठेवतो. आजचा आपला देश तरुणांचा भारत आहे, इथले 65% लोक हे पस्तीस वर्षांखालचे आहेत आणि त्यांना पुरेसे व सन्मानजनक वेतन देणारे काम निर्माण होणे कमी कमी होत चालले आहे. जागतिकीकरण, बाजारी अर्थशास्त्र आणि डब्ल्यू. टी. ओ. आदीवर भरपूर बोलून झाले आहे. उत्पादन क्षेत्रातले यांत्रिकीकरण – ऑटोमायझेशन एवढे वाढले आहे की, तिथे नव्या रोजगाराला वावच उरला नाही. रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उच्च संशोधन व त्याचे उत्पादनवाढीसाठी वापरणे यामुळे उद्योगपतींचा उत्पादन खर्च कमी होतोय व नफा वाढतोय, पण त्याच वेळी तरुणांचे लाखो रोजगार हिरावले जात आहेत. नवे उच्च बुद्धिमत्तेचे नवे रोजगार निर्माण होत आहेत, हे खरे असले तरी त्याचा लाभ मूठभर बुद्धिमंतांनाच मिळणार आहे. इतर लाखो सामान्य तरुणांचं काय? माणसाला यंत्र त्याचे कष्टाचे काम सुकर व्हावे म्हणून निर्माण झाले, पण आज व भविष्यात तेच जर हावी होणार असतील, तर तरुण बेकार व रिकामा राहील, त्याने काय करायचे? कारण काम न करणे व रिकामे राहाणे हा शाप आहे आणि रिकामे मन हे सैतानाचे घर असते, ही सत्यरूपी म्हण तर सर्वांना माहीत आहे. मग असे रिकामे मन, रिकामे हात असलेल्या अस्वस्थ तरुणांनी काय करायचे? त्यांच्यात वाढत जाणारी धार्मिकता व उन्माद कशाचे लक्षण आहे? आणि त्याचा लबाडीने राजकीय पक्ष, जातीय-धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापर करत आहेत. मतांचे भरघोस पीक काढत आहे.
आज तरुण एवढा खदखदतो आहे की कोणत्याही निमित्ताने त्याच्या दबलेल्या रागाचा व संतापाचा उद्रेक होतो. मग हिंसा, महिलांवरील अत्याचार, दहशतवाद हे एकरूप या उद्रेकाचे तर दुसरे ताणतणाव. सत्तर-ऐंशी टक्के तरुण जर असे अस्वस्थ व आशेचा दीप मालवून बसलेले असतील तर देश कसा समर्थ होणार? त्यामुळे आजचा तरुण जातीय अस्मिता, इतिहासकालीन प्रेरणा आणि भ्रामक धार्मिक परंपरेत अडकला जात आहे. पुन्हा निवडणुकीच्या राजकारणारमुळे तो धर्म-जात-समूहाची आधुनिक काळाला विसंगत असणारी अस्मिता जखमांप्रमाणे कुरवाळीत बसत आहे. येथे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वेदीवर बळी पडलेले व शहीद झालेले डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्त्येचा उल्लेख केला नाही, तर मी अपराधी ठरेन. हे दोघेही विवेकवादी व विज्ञाननिष्ठ आधुनिक विचारांचे होते. ते संयमी व अहिंसेवर विश्वास ठेवणारे होते. तरीही त्यांना काही व्यक्ती किंवा गटांना संपवावसे वाटले, आणि गोळीनं संपवलंही. त्यांच्या खुनाचा अजूनही उलगडा होतनाही, ही आजची फार मोठी शोकांतिका आहे. हीच बाब कर्नाटकातील दोन विचारवंतांच्या हत्येची आहे. यामुळे समाजजीवनात एक अस्वस्थता आहे. ती सरकार समजून घेईल का? एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक आहे, या शतकात भारताचा – महाराष्ट्राचा 65% जनसंख्या असणारा तरुण वर्ग हा स्वभाषेतून ज्ञानसंपन्न व्हावा आणि त्यानेसमर्थ विकसित भारताचे आपण सार्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करावे यासाठी भाषा व साहित्यातून त्याला प्रेरणा व दिशा मिळावी, त्यासाठी या व अशा संमेलनाने नवेविचार देत काम करावे, अशी अपेक्षा आहे. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद स्वीकारून भारताचा राष्ट्रवाद घडत गेला आहे. त्यामुळे या राष्ट्रकल्पनेमध्ये बहुधार्मिकता, बहुसांस्कृतिकता आणि शांततामय सहअस्तित्व यांना मोलाचे स्थान आहे व त्यातूनच भारताचा राष्ट्रवाद विकसित झाला आहे. पण देश म्हणजे केवळ भूभाग नाही तर तिथली माणसे असतात, म्हणूनच गुरूदेव टागोर म्हणतात ते महत्त्वाचे आहे, राष्ट्रवादापेक्षा माझ्यासाठी मानवता महत्त्वाची आहे. आज राष्ट्रवादाच्या नावाने काहींवर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारणे, खटले भरणे आणि माणुसकी विसरणे असे प्रकार होत असताना, गुरूदेवांचा विचार सांगण्याची व आचरण्याची गरज मला वाटत आहे.
आज मराठी भाषा चिंध्या पांघरून मंत्रालयासमोर जीवदान मागत आहे, असे जर मी विधान केले तर शासनाने ती अतिशयोक्ती मानू नये. कारण आजच मुंबई, महानगरे व मोठ्या जिल्हा मुख्यालयी शिक्षणाची तर सोडा बोलण्याची व जनव्यवहाराची भाषाही मराठी राहिली नाहीये, हे कटू वास्तव आहे आणि पुढील काळात आपण काही उपाययोजना केली नाही, तर ग्रामीण भागातही बर्याच अंशी हीच परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे, हे सांगायला तज्ज्ञांची किंवा ज्योतिषाची गरज नाही. जेव्हा राज्यभाषेचा दर्जा भाषेला (येथे मराठीला) प्राप्त होतो, तेव्हा लोकजीवन समृद्ध करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपण त्या भाषेकडे पाहत असतो. मराठी भाषेचे राज्य आल्यानंतर ज्ञानाच्या सर्व क्षेत्रातील संपदा तिने मराठी जीवनात आणली पाहिजे. त्याकरिता मराठी भाषा ही अधिक विचारप्रवाही, अधिक विचारवाही झाली पाहिजे. आजची मराठी अवस्था त्यामुळेच विदारक बनली आहे. मी अध्यक्ष म्हणून महामंडळ व इतर काही संस्थेच्या मदतीने यावर्षी अनुदानाची कार्यशाळा घेणार आहे तसेच ऑनपद्धतीने सर्जनशील लेखन – जसे कथा, कादंबरी व कविता लेखनाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करत आहे. जेणे करून त्यातून नवे लेखक पुढे येतील.
– लक्ष्मीकांत देशमुख
अध्यक्ष अ. भा. म. साहित्य संमेलन