लेखापरिक्षण अहवाल देण्यास टाळाटाळ

0

कोर्‍हाळे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार उघडकीस

बारामती । बारामती तालुक्यातील 9 ते 10 ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. आता कोर्‍हाळे ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण हाती आले आहे. 2015-16 या वर्षात ग्रामपंचायतीचा लेखापरिक्षण अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. या अहवालाची मागणी केली असता अजून काही वेळ लागेल. असे सांगितले जात आहे.

कोर्‍हाळे ग्रामपंचायतीचे सन 1916 -1917 चे पंचायत समितीचे योजना विवरणपत्र हाती आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेच्या नावाखाली बैंगलोर येथे आर्ट ऑफ लिव्हींमध्ये प्रशिक्षण दिल्याचे दाखवून 36 हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. यातील आश्‍चर्याची बाब म्हणजे गावातील ग्रामस्थांना या कोर्सला नेण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून 500 रुपयांची वर्गणी घेण्यात आली होती. मग शासकीय निधी गेला कुठे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा कोर्सेसला सरकारी निधी वापरता येत नाही. असे असताना ग्रामपंचायतीने या निधीची उधळपट्टी केल्याचे दिसत आहे.

विविध कामांसाठी लाखो खर्च
याच आर्थिक वर्षात बचतगट स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य व प्रशिक्षणासाठी 15 हजार, कचरा कुंड्यांसाठी 5 हजार, क्रिडांगण आराखडा व सिमेंटच्या बाकडांसाठी 3 लाख 14 हजार 320, कृषी अभ्यास सहलीसाठी 30 हजार, स्वयंरोजगार प्रशिक्षण मदत 18 हजार 698, शाळांना संगणक 85 हजार, जिल्हापरिषद शाळेच्या क्रिडांगणासाठी 50 हजार, धुरळणी व तणनाशक फवारणी 35 हजार, घनकचरा व्यवस्थापन 50 हजार, एल.ई.डी., सौरदिवे 63 हजार 694, घरकुल, फळबाग लागवड, गायगोठा 18 हजार, भूमिगत गटारांसाठी 2 लाख 20 हजार, वृक्ष लागवडीसाठी 1 लाख, सांडपाणी व्यवस्था 2 लाख, शाळाबाहेरील प्रकाश सुविधा 20 हजार, जिल्हापरिषद शाळेचा रनिंग बोर्ड 20 हजार, विद्यार्थीनींना कराटे प्रशिक्षण देण्यासाठी 10 हजार, शौचालय युनिट दुरुस्तीसाठी 25 हजार, गप्पीमासे टाकी 20 हजार, समाजमंदिर साहित्यासाठी 30 हजार, रस्ता मुरमीकरण 1 लाख 6 हजार 686 अशा स्वरूपात खर्च केल्याचे ग्रामपंचायतीने दाखविले आहे.