दुषीत पाणीपुरवठया प्रकरणी संमधीतांवर कारवाईचे आश्वासन
शिरूर : शहराला नगरपरिषदेच्यावतीने दुषीत पाणी पुरवठा होत असल्याच्या विरोधात विरोधी पक्षनेते व नगरसेवक मंगेश खांडरे यांनी गुरूवार (दि.8)पासुन नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच सायंकाळी पिण्याच्या पाण्याबाबत दोष आढळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून संबंधीतांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी आंदोलक नगरसेवक मंगेश खांडरे यांना दिल्यानंतर सुरू केलेले धरणे आंदोलन थांबवण्यात आले.
तसे लेखी आश्वासनाचे पत्र सभागृहनेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शिरूर शहर विकास आघाडीचे प्रभाकर डेरेमामा,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक,बांधकाम समितीचे सभापतीचे सभापती अभिजीत पाचर्णे,पाणी पुरवठा सभापती विठ्ठल पवार,नगरसेवक संजय देशमुख,माजी नगरसेवक जाकिरखान पठाण,मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेबुब सय्यद,माधवसेनेचे रविंद्र सानप,प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,चाँदभाई बळबट्टी,स्वप्नील माळवे,अविनाश घोगरे,संजय बांडे,रामभाऊ इंगळे आदिंसह नागरीक उपस्थित होते.
अहवालात दोष आढळल्यास कारवाई
आंदोलक नगरसेवक मंगेश खांडरे यांना मुख्याधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे की,जलशुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी नगराध्यक्षा व पदाधिकारी यांनी केली असुन शुध्दीकरण प्रक्रीया योग्य प्रकारे होत आहे.राज्य आरोग्य प्रयोग शाळेकडून पाणी नमुने तपासणी करून घेण्यात आलेले असुन शुध्दीकरणाबाबत नगरपरिषदेकडुन आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.तरीदेखील शुध्दीकरणानंतर पाण्यात कोणता दोष निर्माण होत आहे याबाबत पाणी नमुने तपासणीकरीता राज्य आरोग्य प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत. तपासणी अहवालात दोष आढळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे दिलेल्या लेखी आश्वासन म्हटले आहे.