वार्षिक कर आकरणीमुळे एकूण उत्पन्न 22 कोटी
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने राबविला उपक्रम
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने अद्यावत यंत्राद्वारे अर्थात ड्रोन कॅमेराद्वारे अचूकपणे मालमत्तेच्या चतुर्थ वार्षिक कर आकरणी केली. त्यामुळे तळेगाव दाभाडे शहरातील एकत्रीत मालमत्ता करांचे एकूण उत्पन्न 22 कोटी 97 लाख रुपये झालेले आहे. तर शहरातील एकूण 33 हजार 992 मालमत्तांची (घरांची) नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितली. त्यामुळे या वर्षात शहरातील घरांची नोंदणी पुर्ण झाली आहे. तसेच यामुळे तळेगाव नगरपरिषदेला मोठे उत्पन्न मिळाले आहे. शहरातील विविध ठिकाणी यामुळे विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात तळेगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली दिसून येणार आहेत.
मालमत्तांची नोंदणी केली
नगरपरिषदेच्या करसंकलन (वसुली) विभागाकडून नुकतीच शहरातील मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. ही नोंदणी अद्यावत ड्रोन कॅमेरा या यंत्राद्वारे करण्यात आली आहे. घरोघरी लेझर, मशीन आणि ड्रोन यंत्राच्या सहाय्याने सर्वेक्षण खाजगी एजन्सीमार्फत करण्यात आले. या मोजणीत 33 हजार 992 मालमत्ता प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासल्या आणि त्यांचे अचूक मोजमाप करून नंतर मालमत्ता करांची आकारणी कण्यात आली असल्याचे कर संकलन अधिकारी विजय भालेराव यांनी सांगितले. त्यामुळे घरांचे खरे मोजमाप आणि कर यांची माहिती मिळाली आहे. या कराद्वारे नगर परिषदेला उत्पन्न मिळाले आहे.
नवीन नोंदणीत 34 हजार घरे
नव्या आकारणीनुसार एकूण 22 कोटी 97 लाख रुपये एकूण मालमत्ता कर उत्पन झालेले आहे. तर शहरातील शंभर टक्के मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. यावर्षी प्रथमच वार्षिक उत्पन्न दुप्पटीने वाढल्याने नगरपरिषदेच्या तिजोरीत मोठे उत्पन्न येणार असल्याचे करसंकलन अधिकारी भालेराव यांनी सांगितले. यापूर्वी नगरपरिषदेचा एकूण मालमत्ता कर 9 कोटी रुपये होता. तो वाढून 22 कोटी 97 लाख रुपये झाला आहे. पूर्वी 28 हजार मालमत्ता (घरे) होती. नवीन नोंदणीत 34 हजार इतकी झाली आहे. पूर्वी शहरात 1500 भाडेकरूंची घरे होती. ती नव्या नोंदणी 5 हजार 500 इतकी झालेली आहेत. त्यामुळे चार हजार भाडेच्या घरांचे उत्पन्न वाढले आहे.
विशेष स्वच्छता कर
यावेळी नगरपरिषदेने स्वच्छ भरत अभियानांर्तगत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 100 रुपये विशेष स्वच्छता कराची आकारणी केली आहे. यापासून 80 लाख रुपयांचे नवीन उत्पन्न नगर नगरपरिषदेस मिळणार आहे. नगर नगरपरिषदेने अद्ययावत यंत्रद्वारे प्रत्येक घराची भाडेकरू समवेत दोन वेळा मोजणी करून त्यानंतरच मालमत्ता कराची आकारणी केली आहे. त्यामुळे प्रत्येक घराचा कर वाढल्याने मालमत्ता धरकांमध्ये असंतोष पसरला आहे. सध्या नगर नगरपरिषदेत सर्व घर मालकांना घरपट्टी आकारणीच्या नोटीसा पाठविल्या असून अनेकजन वाढीव पट्टी समजावून घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयात धाव घेत आहे. त्याबाबत तक्रार अर्ज देत आहेत.