मुंबई । महापालिका मुख्यालयातून सर्व कामांना मंजुरी देण्यात येत असताना याच मुख्यालयात एखाद्या केलेल्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी यायला तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेने विशेषतः पावसाळ्यात उद्भवणार्या लेप्टो स्पायरोसिस या प्राण्यांपासून होणार्या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेली 45 सेकंदांची फिल्म शासनमान्य यूएफओ डिजिटल सिनेमा या संस्थेमार्फत मुंबईतील 101 सिनेमागृहांत सॅटेलाइटद्वारे 19 ऑगस्ट 2016 ते 28 ऑगस्ट 2016 या कालावधीत दाखवण्यात आली. दररोज 4 शो याप्रमाणे 10 दिवस ही फिल्म नागरिकांना दाखवण्यात आली.
महापालिकेने 2 लाख 82 हजार 555 रुपये केले खर्च
लेप्टो हा आजार प्राण्यांच्या मलमूत्रामुळे होतो. संसर्गित प्राण्यांच्या मूत्राद्वारे दूषित झालेल्या पाण्याशी, एखाद्या व्यक्तीच्या पायाची जखम संपर्कात येते व ते मलमूत्रमिश्रित पाणी त्या जखमेतून पायात शिरते. त्यानंतर त्या व्यक्तीला या लेप्टोचा आजार होतो, त्यावर वेळीच उपचार न केल्यास ती व्यक्ती या आजारपणामुळे दगावते. त्यामुळे नागरिकांनी, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणे शक्यतो टाळावे किंवा गमबुटांचा वापर करावा, असे आवाहन या जनजागृतीपर फिल्ममध्ये करण्यात आले होते तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्सीसायक्लिन हे औषध घेतल्यास लेप्टोच्या आजाराला प्रतिबंध करता येतो, असे या फिल्ममध्ये दाखवण्यात आले होते. त्यासाठी पालिकेने 2 लाख 82 हजार 555 रुपये खर्च केले. मात्र, याबाबतचा कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी दीड वर्षांनी आला आहे.