लेप्टोस्पायरोसिसचे तीन रुग्ण आढळले

0

पुणे । लेप्टोस्पायरोसिसचा फैलाव शहरात हळूहळू वाढत आहे. या आजाराची बाधा झालेले तीन रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी एक रुग्ण हा शहरातील तर दोन रुग्ण हे शहराच्या बाहेरील आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी तीन शहरातील तर दोन शहराबाहेरील आहेत. यापैकी वारजे येथील एका रुग्णाचा महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे.

हा जीवघेणा लेप्टोस्पायरोसिस पावसाळ्यात पसरतो. लेप्टोस्पायरा या जंतुची लागण झालेल्या उंदीर, घुस किंवा गायी, म्हशी, डुकरे यांची विष्ठा जर जमिनीवर साचलेल्या पाण्यात पडली की, त्याच्या जंतूंचा प्रसार होतो. माणसाला झालेली जखम, नाक, तोेंड अथवा डोळ्यांतून या आजाराची लागण होते. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, डोळे सुजणे ही लेप्टोस्पायरोसिसची प्रमुख लक्षणे आहेत. यामध्ये रुग्णाचे मुत्रपींड व यकृत निकामी होऊन मृत्यूही ओढावू शकतो.

एकाचा मृत्यू
जानेवारी महिन्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. तर गेल्या महिन्यात 2 तारखेला वारजे येथील एका 74 वर्षीय रुग्णाचा लेप्टोस्पायरोसिने मृत्यू झाला होता. मात्र, आता शहरातील आणखी एका रुग्णाला लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे समोर आले असून तो ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच दोन रुग्ण हे शहराबाहेरील असून त्यांच्यावरही ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुणे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी दिली.